Sat, Aug 24, 2019 09:45होमपेज › Pune › महापौर नतमस्तकप्रकरणी राष्ट्रवादीचे मौन का?

महापौर नतमस्तकप्रकरणी राष्ट्रवादीचे मौन का?

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:51PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपवर कडाडून टीका करत असताना पिंपरी- चिंचवडच्या महापौरांचे राज ठाकरेंवरील प्रेम दिसून आले. एका कार्यक्रमात नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक झाले. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापौरांच्या या कृतीस आक्षेप घेतल्याने महापौर अडचणीत आले. मात्र, बारा बलुतेदार महासंघाने महापौरांचे नतमस्तक होणे भारतीय संस्कृतीला साजेसे असल्याचे सांगत महापौरांची पाठराखण केली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने या विषयावर बाळगलेले  मौन हा चर्चेचा विषय आहे. हे मौन म्हणजे राजकीय शहाणपण की भाजपशी सहमतीचे राजकारण, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

राज यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा राहुल जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश करून राजकारणात एन्ट्री केली. मनसेच्या तिकिटावर ते 2012 साली पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आले. 2017 साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यंदा त्यांना महापौर होण्याचा मान मिळाला. महापौरपदाच्या निवडणुकीतही मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले यांनी जाधव यांनाच मत दिले होते. त्यामुळे महापौर जाधव यांच्या मनातील मनसेविषयीचे प्रेम आणखी वाढल्याचे नतमस्तकनिमित्ताने दिसून आले.

मंडल आयोग लागू करून ओ.बी.सी.समाजाला न्याय देणारे दिवंगत माजी पंतप्रधान  व्ही. पी. सिंग यांच्याबद्दल राज यांनी केलेल्या वक्‍तव्याची आठवण करून देत मारुती भापकर यांनी महापौरांच्या या कृतीवर आक्षेप घेतला. मात्र, बारा बलुतेदार संघाने महापौरांची पाठराखण केली. महापौर जाधव यांनी राज ठाकरेंना अभिवादन करणे म्हणजे ओबीसी चळवळ दावणीला बांधणे होत नाही.विरोधकांशी गळाभेट, वयपरत्वे अभिवादनाची अनेक उदाहरणे आहेत. महापौरांनी भारतीय संस्कृतीला साजेसे वर्तन केले आहे. त्यावर  हरकत घेणार्‍याची कोल्हेकुई म्हणजे  सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेलेली पत परत मिळविण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली.

याप्रकरणी चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली असताना पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने या विषयावर बाळगलेले मौन हा चर्चेचा विषय झाला आहे.विरोधी पक्षनेते दत्ता साने व महापौर राहुल जाधव यांचे स्नेहाचे संबंध आहेत. दोघांनीही विधानसभेला अपक्ष आमदार महेश लांडगे यांचे काम केले होते. पुढची राजकीय गणिते लक्षात घेऊन साने राष्ट्रवादीतच राहिले. पुन्हा निवडणूक जिंकत विरोधी पक्षनेतेही झाले. भाजपला त्यांनी चांगलेच लक्ष्य केले आहे.  साने व राहुल जाधव  मैत्री असतानाही राष्ट्रवादीने  महापौर निवडणूक लढवली. त्यातून लोकांमध्ये एक चांगला संदेश गेला. पण आता महापौर नतमस्तक प्रकरणी राष्ट्रवादीने बाळगलेले मौन हा चर्चेचा विषय आहे. हे मौन म्हणजे राजकीय शहाणपण की भाजपशी सहमतीचे राजकारण, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.