होमपेज › Pune › श्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

श्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Published On: Jan 09 2019 1:28PM | Last Updated: Jan 09 2019 2:13PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने मराठी साहित्य संमेलनात वाद निर्माण झाला आहे. हा वाद ताजा असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. श्रीपाद जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर आपला राजीनामा पाठविला आहे. 

श्रीपाद जोशी यांनी राजीना देण्याचे कारण सांगितलेले नाही. 'जे काय सांगायचे होते, ते सांगून झाले आहे. गेले दोन दिवस माध्यमांच्याच सेवेत असल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष काहीही काम करू शकलेले नाहीत. थकून गेले आहेत. कृपया कुणीही माझ्याशी संपर्क साधू नये,' असे जोशी यांनी माध्यमांना कळवलं आहे. यापुढे काहीही माहिती हवी असल्यास महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे विचारणा करण्यात यावी असे श्रीपाद जोशी यांनी म्हटले आहे. 

दरम्‍यान, यवतमाळमध्ये ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सांगितले होते. त्‍यामुळे साहित्यिकांमध्ये नाराजी पसरली आहे.