Thu, May 28, 2020 09:02होमपेज › Pune › सेनेच्या बैठका शिवसेना भवन ऐवजी बड्या हॉटेलातच 

सेनेच्या बैठका शिवसेना भवन ऐवजी बड्या हॉटेलातच 

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:13AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

छत्रपती शिवाजीमहाराज युद्धाची योजना गडावर आखायचे, त्याचप्रमाणे शिवसेना भवन आपला गड आहे.  हे कार्यालय आपल्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या आवाहनाला शहर शिवसेनेने  हरताळ फासल्याचे दिसत आहे

सेनेचे स्थानिक पदाधिकारी  मोठ्या हॉटेल्समध्येच बैठका घेत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यासाठी  सेना भवनची जागा अपुरी पडत असल्याचे कारण पुढे केले जात आहे.  मात्र भाजप, राष्ट्रवादी कार्यालयाप्रमाणे शिवसेना   कार्यालयासाठी मोठी जागा का शोधत नाही असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.

शहरात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर), श्रीरंग बारणे (मावळ) असे दोन खासदार व गौतम चाबुकस्वार (पिंपरी) यांच्या रूपाने एक आमदार आहे.   मात्र  महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी ,चुकीचे तिकीट वाटप यामुळे सेनेला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले.  भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून  सत्ता संपादन केली. 

मात्र  लोकसभा, विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने शिवसेनेने पुन्हा कंबर कसली आहे.  शिवसेना नेते खा.  राऊत यांच्याकडे विभागीय संपर्क नेते म्हणून जबाबदारी सोपवली गेली .  राऊत यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  त्यांनी एप्रिलमध्ये  आकुर्डी येथील शिवसेना भवनला भेट दिली. 

त्यावेळी  खा.  राऊत यांनी  ’आगामी निवडणुकीत शिवशाहीचा सेतू बांधण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे. पिंपरी- चिंचवड, भोसरीतून शिळा आणल्या पाहिजेत, त्यासाठी शिवसेना कार्यालय गजबजायला हवे. पक्षाची बांधणी, आखणी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातूनच व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाची योजना गडावर आखायचे त्याच प्रकारे शिवसेना भवन आपला गड आहे. हे कार्यालय आपल्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. या कार्यालयाद्वारे आपल्या राजकीय हालचाली वाढल्या पाहिजेत असे आवाहन  केले होते 

सेनेच्या स्थानिक नेत्यांनी खा.  राऊत यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसू लागले  पक्षाच्या  बैठका आकुर्डी शिवसेना भवन येथे होऊ लागल्या मात्र नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे झाले .पुन्हा एकदा पक्ष बैठका संभाजीनगर येथे शहरप्रमुख योगेश बाबर यांची भागीदारी असलेल्या बड्या हॉटेल मध्ये होऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही जणू स्थानिक नेत्यांपुढे हात टेकल्याचे दिसत आहे

मावळ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या  बैठका  गुरुवारी संभाजीनगर येथे  पार पडल्या. या बैठकांमध्ये शिवसेना नेते ,खासदार  संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

नेत्यांनी मीपणा, अहंमपणा सोडून सामान्य कार्यकर्त्याला महत्व द्यावे.  प्रामाणिक  कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या  करून त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करावी. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यामुळे मीच मोठा या भ्रमात राहू नका असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना नेते खासदार राऊत यांच्या भाषणाने शिवसैनिकांना ऊर्जा मिळाली खरी पण सेनेचे गटनेते राहुल कलाटे समर्थकांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकणारी होती त्याबरोबरच ही बैठक शिवसेना भवनऐवजी एका मोठया हॉटेलमध्येच घेण्यात आल्याने शिवसेना भवन हे सेनेच्या कामाचा केंद्रबिंदू बनविण्याच्या निर्धाराचे काय झाले असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.