Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Pune › साहेब, आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा; रोहित पवारांची भावनिक पोस्ट

साहेब, आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा; रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Published On: Mar 12 2019 12:41PM | Last Updated: Mar 12 2019 2:58PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

नातू पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी, 'साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा', असे आवाहन केले आहे. याबाबत रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, “राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे. पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली ५२ वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हीच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे. 

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली ५२ वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.'' 

एक कार्यकर्ता म्हणून,
“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.''

शरद पवार यांचा नातू म्हणून बोलण्यापेक्षा, पवारांचा, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून ही पोस्ट लिहिली असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.