Mon, Jul 06, 2020 04:03होमपेज › Pune › रणांगण : मावळात बारणे यांच्यासमोर आव्हान

रणांगण : मावळात बारणे यांच्यासमोर आव्हान

Published On: Feb 18 2019 1:14AM | Last Updated: Feb 17 2019 8:19PM
जयंत जाधव
 

मावळ लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले आहेत. बदलत्या राजकीय घडामोडींनुसार युती झाली किंवा नाही; तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर यावेळी विरोधकांचे आव्हान उभे राहणार आहेच. 

मावळ लोकसभा मतदारसंघ हा दोन भागांत विभागला गेलेला आहे. घाटावर पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व वडगाव मावळ या तीन विधानसभा मतदारसंघांबरोबरच घाटाखालील म्हणजेच रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत व पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. 

2009 च्या पहिल्याच निवडणुकीत युतीच्या वतीने शिवसेनेचे गजानन बाबर निवडून आले होते. 2014 च्या निवडणुकीतही युतीच्या वतीने शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडून आले. बारणे यांना 5 लाख 12 हजार 223 मते मिळाली, तर शेकाप-मनसेच्या वतीने निवडणूक लढलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांना दुसर्‍या क्रमांकाची 3 लाख 54 हजार 829 मते मिळाली. बारणे यांनी 1 लाख 57 हजार 394 मतांच्या फरकाने विजय मिळविला होता; तर नवखे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल नार्वेकर यांना तिसर्‍या क्रमांकाची 1 लाख 82 हजार 293 मते मिळाली होती. 

बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये खासदार बारणे यांचे प्रतिस्पर्धी आमदार जगताप आता भाजपचे आमदार व पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा भाजपचे शहराध्यक्ष आहेत, तर चिंचवड येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व नगरसेवकांनी शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये; दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही व मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे केली व आग्रहही धरला होता. 

रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापची आघाडी आहे. हीच आघाडी पुढे कायम राहिल्यास घाटाखालील उरण, कर्जत व पनवेल हा तीन विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीला शेकापची मोठी मदत मिळणार आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा होऊ लागली आहे. भाजप-शिवसेनेत होत असलेला दुरावा व दुसरीकडे विरोधकांची होत असलेली जमेची बाजू, असे एकंदरीत चित्र सध्या आहे. 

पिंपरी विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबूकस्वार निवडून आलेले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप निवडून आलेले आहेत. वडगाव मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय ऊर्फ बाळा भेगडे निवडून आलेले आहेत. तर उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर निवडून आलेले आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड निवडून आलेले आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर निवडून आलेले आहेत. 

या मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड व पनवेल महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर वडगाव मावळ नगरपंचायतीत भाजप व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना आठ-आठ जागा आहेत. लोणावळ्यात काँग्रेस व भाजपची संमिश्र सत्ता आहे. तळेगाव नगर परिषद व मावळ पंचायतीत भाजपची सत्ता आहे. देहूरोड कँटोन्मेंट बोर्डात भाजपची सत्ता आहे. कर्जत नगरपालिकेत शिवसेना व भाजपची सत्ता आहे. माथेरान नगर परिषदेत शिवसेना व खोपोली नगरपालिकेत राष्ट्रवादीची; तर खालापूर नगरपालिकेत शेकापची सत्ता आहे.  

शिवसेना-भाजप युती झाल्यास विद्यमान खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. बारणे यांना लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाच वेळा ‘संसद रत्न’ पुरस्कार मिळालेला आहे; परंतु गेल्या पाच वर्षांत पक्षांतर्गत स्थानिक नेतृत्वाबरोबरही त्यांची काही प्रमाणात नाराजी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासारख्या नेत्यांबरोबर दुरावलेले संबंध त्यांना निवडणुकीपूर्वी सुधारावे लागणार आहेत. त्याचबरोबर युती झाल्यास भाजपमधील नाराज नेत्यांचीही मोट बांधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. 

युतीवर लढतींचे भवितव्य

युती न झाल्यास भाजपच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव चर्चेत आहे. जगताप यांना पक्षातर्फे संधी मिळाल्यास त्यांनाही बारणे यांच्या पराभवाचे उट्टे काढावयाचे आहे. त्यामुळे युती होण्यावर या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. युती न झाल्यास तिरंगी लढत, युती झाल्यास शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.