Sun, Aug 18, 2019 06:37होमपेज › Pune › पुण्याची जागा काँग्रेसकडेच : अजित पवार

पुण्याची जागा काँग्रेसकडेच : अजित पवार

Published On: Feb 12 2019 1:35AM | Last Updated: Feb 12 2019 1:34AM
पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांपैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे पुण्याची चौथी जागा काँग्रेसला दिली पाहिजे, अशी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांची भूमिका आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग़्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार या जागेसाठी आग्रही असून, त्यांनी वेळोवेळी पुण्याच्या जागेवर हक्कही सांगितला आहे. याबाबत सोमवारी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, राज्यातील 48 पैकी 44 जागांच्या वाटपाचा निर्णय झाला आहे, उर्वरित 4 जागांवर लवकरच एकमत होईल. त्यानंतर मित्रपक्षांना कोणत्या जागा द्यायच्या यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. पुण्याच्या जागेचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, जिल्ह्यातील तीन जागा राष्ट्रवादीकडे असल्याने उर्वरित एक जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे जागा गेली तरी आम्ही त्यांच्या उमेदवाराचे काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी पवार यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. भाजपला काय करू अन् काय नको, असं झालंय. खरंतर त्यांनी राज्यात 43 नाही तर सर्वच्या सर्व 48 जागांवर दावा केला पाहिजे होता. मुख्यमंत्री विरोधकांवर ज्या भाषेत टीका करतात, त्यांना ती शोभत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बारामतीची जागा जिंकायची असेल, तर त्याचे स्वागत आहे. मतदारांना ज्यांची भूमिका योग्य वाटेल त्यांना ते निवडून देतील, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.