होमपेज › Pune › दोन पोलिस प्रशिक्षकांची पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा कायम

पोलिस प्रशिक्षकांची सक्तमजुरीची शिक्षा कायम

Published On: May 15 2019 4:16PM | Last Updated: May 15 2019 4:16PM
पुणे :  प्रतिनिधी 

प्रशिक्षणाला कंटाळून पळून गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल तरुणाने पुन्हा प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून त्याचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांना पाच वर्षे सक्तमजुरीची दिलेली शिक्षा अपीलात कायम ठेवण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी सहायक न्यायाधीशांनी दिलेला निकाल कायम ठेवला आहे.    

याप्रकरणी प्रशिक्षक नानासाहेब भीमराव साळुंखे (वय ४५, रा. खडक पोलिस वसाहत) आणि रामचंद्र तात्याबा घुले (वय ५६, रा. ईसीपी वास्तू, अर्थर्व पुर्वा सोसायटी, हांडेवाडी रोड हडपसर) या दोघांना देण्यात आलेली शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे. देविदास सुर्यभान पुंजरवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ पोलिस कॉन्स्टेबल शिवशंकर सुर्यभान पुंजरवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. अपीलामध्ये अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहाताना दोघांनाही शिक्षा देण्याची मागणी केली.  

देविदासची पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. त्याचे प्रशिक्षण सुरू होते. मात्र, प्रशिक्षण खडतर असल्यामुळे तो पळून गेला होता. त्याचे वडील सूर्यभान यांनी त्याला प्रशिक्षणाच्या ठिकाणी आणून सोडले होते. त्यावेळी संबंधित पोलिस निरीक्षकांनी त्याला कामावर रुजू करून घेतले होते. मात्र, त्यासाठी त्याच्याकडे नानासाहेबने पाच हजार आणि रामचंद्रने दहा हजार रुपये मागितले होते.

मात्र, पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांचा छळ सुरू केला. होणार्‍या त्रासाला कंटाळून ४ सप्टेंबर २०१२  रोजी पहाटे चारच्या सुमारास त्याने झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. साळुंखे आणि घुले यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे एसएमएस त्याने दहा मित्रांना पाठविले होते. याशिवाय वर्दीवरही दोघांकडून त्रास दिला जात असल्याचे लिहून ठेवले होते. फिर्यादीचे वडील सूर्यभान पुंजरवाड यांची साक्ष याप्रकरणात महत्त्वाची ठरली होती. या खटल्यात तब्बल १८ जणांची साक्ष झाल्यानंतर १९ डिसेंबर २०१४  रोजी शिक्षा सुनावली होती. या खटल्यात अ‍ॅड. मोरे यांनी काम पाहिले. तर दोघांविरूध्द सबळ पुरावे असून दोघांची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली.