होमपेज › Pune › शास्तीकर वगळून मिळकतकर घेता येणार नाही : आयुक्त हर्डीकर

शास्तीकर वगळून मिळकतकर घेता येणार नाही : आयुक्त हर्डीकर

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 1:14AMपिंपरी : प्रतिनिधी

शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारणे कायद्याने शक्य नाही. सॉफ्टवेअरमध्ये प्रोव्हिजन नसल्याने शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारता येणार नाही. तसे करायचे झाल्यास राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने शास्तीकर रद्द करणार, पूर्वलक्षी शास्तीकर माफ करणार, असे आश्वासन शहरवासीयांना दिले.  भाजपची एकहाती सत्ता येऊन वर्ष झाले, तरी ते एकही आश्वास पूर्ण करू शकले नाही. नागरिकांकडून मिळकतकराऐवजी शास्तीकर भरून घेतला जात आहे. यामुळे नागरिक हैराण झाले  आहेत. त्यासाठी पालिकेने शास्तीकराशिवाय  मिळकतकर स्वीकारावा, अशी मागणी करत शिवसेनेने गुरुवारी (दि. 15) आयुक्त श्रावण हार्डकर यांना ऑटो क्लस्टर  येेथे  घेराव घातला. त्याच विषयावर सविस्तर चर्चेसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिवसेनेला निमंत्रित केले होते. या बैठकीस गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा  दर्शिले आदी उपस्थित होते.  

या वेळी आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारणे कायद्याने शक्य नाही. सॉफ्टवेअरमध्ये प्रोव्हिजन नसल्याने शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारता येणार नाही. तसे करायचे झाल्यास राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितल्याचे गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले.  जप्तीची कारवाई करताना कमर्शिअल बांधकामांवर करावी, निवासी बांधकामांवर करू नये, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने या वेळी आयुक्तांकडे करण्यात आली, असे कलाटे यांनी सांगितले.