Sun, Dec 08, 2019 06:35होमपेज › Pune › कॅशलेसची ऐसी तैसी; ‘फोन पे अ‍ॅप्स’ बनले डोकेदुखी

कॅशलेसची ऐसी तैसी; ‘फोन पे अ‍ॅप्स’ बनले डोकेदुखी

Published On: Jul 24 2019 1:40AM | Last Updated: Jul 24 2019 1:33PM
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर पारदर्शक व्यवहारासाठी कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. शासनाने भीम नावाच्या अ‍ॅप्सची त्यासाठी निर्मिती केली. ‘फोन पे’सारखे खासगी अ‍ॅप्सही व्यवसाय व पारदर्शक व्यवहारास प्रोत्साहन म्हणून मार्केटमध्ये झेपावले. मात्र, ‘फोन पे’वरून पेमेंट केल्यानंतर ज्याने पेमेंट केले त्याला त्याबद्दल एसएमएस येत असला तरी बर्‍याचदा ज्याला पेमेंट केले त्याला मेसेज येत नसल्याने दुकानदार व ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. 

कस्टमर केअर सेंटरवर तक्रार करायला गेल्यास फोन उचलला जात नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पारदर्शकतेसाठी जनतेस कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. मात्र मागासलेली बँक यंत्रणा, लोकांमध्ये विशेषतः खेड्यापाड्यांत व दुर्गम भागात असलेली निरक्षरता, अनेकांचे बॅकांमध्ये खातेही नसणे, डेबिट काई, क्रेडिट कार्ड, मोबाईल व इंटरनेट यंत्रणा वापरण्याबाबतचे अज्ञान या कॅशलेस व्यवहारापुढील अडचणी पुढे आल्या. मध्यंतरी देशातील 21 लाखांहून अधिक डेबिट कार्डचा ‘डाटा’ चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात घेता, भविष्यात लोकांचे बँकांमधील पैसे सुरक्षित राहावेत यासाठी उपाययोजनांची गरज जाणवली. काळा पैसा देशातून हद्दपार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून; तसेच ‘कॅशलेस’च्या दृष्टीने पाऊल म्हणून मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाकडे पहिले गेले; मात्र आज देशातील 125 कोटी लोकांपैकी 40 कोटी लोकांची बँक खातीही नाहीत.

बँकांचा अपुरा विकास, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल व इंटरनेट बँकिंग याबाबतचे अज्ञान व भीती, सायबर क्राईममुळे बँकेतील आपले पैसे सुरक्षित राहण्याबाबतची भीती ही ‘कॅशलेस’पुढील आव्हाने असल्याचे स्पष्ट झाले. 

ऑनलाईन व मोबाईल बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार करा. यूपीआय, यूएसडी, प्रीपेड वॉलेट, कार्ड्स, पीओएस, आधार एबल्ड पेमेंट सिस्टीम’ या पर्यायांचा ‘कॅशलेस’साठी वापर करणे शक्य असल्याचे सांगत या पत्रकातून ‘कॅशलेस’ व्यवहाराचे आवाहन करण्यात आले. मात्र आता यातील अडचणी पुढे येत आहेत. शासनाने भीम अ‍ॅप्सची निर्मिती केली काही खासगी व्यावसायिकही या संधीचा लाभ घेत व्यवसायात आले. ‘फोन पे’ या खासगी अ‍ॅप्सद्वारे पैसे मोबाईलद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे फोनवर पेमेंट करणे सुलभ झाले. कॅशलेस व्यवहारांवर रिवॉर्ड  देत असल्याने ग्राहकांना कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून या अ‍ॅप्सद्वारे केलेल्या व्यवहारांबाबत तक्रारी वाढत आहेत.