Mon, Sep 16, 2019 12:00होमपेज › Pune › पतंगराव कदम यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी अलोट जनसागर

पतंगराव कदम यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी अलोट जनसागर

Published On: Mar 10 2018 11:47AM | Last Updated: Mar 10 2018 12:10PMपुणे : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी (दि. 9) रात्री मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या सिंहगड बंगला या निवासस्थानी आणि भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी अलोट जनसागराने त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव सोनहिरा कारखान्याकडे रवाना करण्यात आले.

सकाळी सातच्या सुमारास पतंगराव कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील सिंहगड बंगला या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी पतंगरावांचे पुत्र व युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते. यावेळी पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार जगदीश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी उपमहापौर दीपक मानकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, कुलगुरू नितीन करमळकर, उल्हास पवार, विठ्ठल मणियार, डॉ. के. एच. संचेती, डॉ. विश्‍वनाथ कराड, बुधाजीराव मुळीक, विद्या येरवडेकर यांच्यासह पुण्यातील राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

त्यानंतर सकाळी 10 च्या सुमारास त्यांचे पार्थिव सिंहगड बंगला येथून हलविण्यात आले आणि सुमारे 11 च्या सुमारास भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांनी भारती विद्यापीठात गर्दी केली होती. यावेळी जलसंपदा व संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतारे, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी लोटली होती. पोलिस बंदोबस्तात त्यांचे पार्थिव शैक्षणिक संकुल येथे आणण्यात आले. तत्पूर्वी, अनेक बडे नेते, प्रशासकीय अधिकारी पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी उभे होते. काही क्षणांतच फुलांनी सजवलेला पार्थिव रथ भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात आला. त्याच क्षणी परिसरात एकच कल्लोळ माजला आणि ‘पतंगराव कदम अमर रहे.. साहेब तुम्ही परत या...’ अशा घोषणांना सुरुवात झाली. ‘ज्येष्ठ नेता हरपला...’ अशा शब्दांत उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. सुमारे 40 हजार पुणेकरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यामध्ये विद्यार्थी, संस्थेतील कर्मचारी, प्राध्यापकवर्ग यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. भारती विद्यापीठ परिसर लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. दुपारी दोनच्या सुमारास कदम यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी हॅलिकॉप्टरमधून सांगली जिल्ह्यातील वांगी येथील सोनहिरा कारखाना येथे नेण्यात आले.