Sun, May 31, 2020 15:30होमपेज › Pune › विमान प्रवाशांची संख्या 5 कोटींनी घटणार

विमान प्रवाशांची संख्या 5 कोटींनी घटणार

Last Updated: Apr 07 2020 11:16PM
पुणे ः पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत विमान वाहतुकीला जबरदस्त फटका  बसणार असून प्रवाशांची संख्या 14 कोटींवरून सुमारे 8 ते 9 कोटीपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तसेच एअरलाइन्स कंपन्यांना 200 पेक्षा जास्त विमाने लवकर मिळणार असल्याचे आधी सांगितले जात होते; पण सद्यस्थितीत त्यांना ही विमाने मिळण्यास 2 किंवा अधिक वर्षे लागू शकतात.

सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन इंडिया म्हणजेच सीएपीए इंडियाने कोव्हिड-19 अँड स्टेट ऑफ इंडियन एव्हिएशन इंडस्ट्री या अहवालात ही गोष्ट स्पष्ट केली आहे.

अहवालानुसार कोरोनामुळे विमान प्रवासावर निर्बंध आल्याने आणि एकूणच अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे 2021 च्या पहिल्या तिमाहीत हवाई उद्योगाची अवस्था अत्यंत दयनीय असेल. दुसर्‍या तिमाहीत मागणी खूपच कमी असेल, असे म्हटले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 15 एप्रिलपर्यंत बंद आहेत. एकूण स्थिती लक्षात घेता तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीत स्थिती सर्वसाधारण होण्याच्या द‍ृष्टीने वाटचाल करू लागेल, अशी अपेक्षा आहे. 

विमान कंपन्या सर्वसाधारणपणे विमाने दीर्घ मुदतीच्या कराराने भाड्याने घेतात; पण सवलतीत मिळताहेत म्हणून जादा विमाने हवी आहेत का, हे कंपन्यांना ठरवावे लागेल. कारण, सवलतींच्या तुलनेत ही विमाने सुस्थितीत ठेवण्याचा खर्च जास्त असू शकतो. येत्या काही दिवसांत 200 विमाने एअरलाइन्सच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता होती. त्यात 56 मॅक्स विमानेही आहेत. आता त्याला 2 वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक विलंब लागू शकतो. या अहवालाच्या अंदाजानुसार एप्रिल 2020 अखेरपासून किमान 100 विमाने भाड्याने देणार्‍या कंपन्यांना परत दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यांची साधनसामग्री जुनी झाली आहे किंवा ज्यांचा करार संपला आहे, ती विमाने परत दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. सप्टेंबर 2020 पर्यंत सुमारे 200 ते 250 विमाने परत केली जाऊ शकतात. विमाने भाड्याने देणार्‍या कंपन्यांचे ग्राहक अर्थातच मर्यादित आहेत. त्यामुळे ते परत केलेल्या विमानांचे रिमार्केटिंग करण्याची शक्यता आहे. त्या स्थितीत ते भाड्याबाबत भरघोस सवलतींसाठी वाटाघाटी करण्याची शक्यताही आहे. 

आंतरराष्ट्रीय प्रवासीही घटणार

गतवर्षी आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या 7 कोटींच्या घरात होती; पण चालू आर्थिक वर्षात ती संख्या साडेतीन किंवा चार कोटींपेक्षाही कमी असेल. संस्थेचे हे प्राथमिक अंदाज असून भविष्यकाळात यात परिस्थितीनुरूप सतत बदल होऊ शकतात.