Thu, May 28, 2020 12:13होमपेज › Pune › केरळमध्ये ६ जूनला तर राज्‍यात १२ जूनला मॉन्सूनची एन्ट्री 

राज्‍यात १२ जूनला मॉन्सूनची एन्ट्री 

Published On: May 15 2019 3:41PM | Last Updated: May 15 2019 3:41PM
पुणे : प्रतिनिधी 

नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबणीवर पडले आहे. 6 जून रोजी तो केरळमध्ये डेरेदाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. स्कायमेट पाठोपाठ आयएमडीने केरळमधील यंदाच्या वर्षीची आगमनाची तारीख बुधवारी (दि.15) जाहीर केली. दरम्यान, स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल होणार असून आयएमडीच्या अंदाजानुसार तो आणखी दोन दिवस उशिराने दाखल होणार आहे. केरळमध्ये वेळापत्रकानुसार 1 जून रोजी मान्सून दाखल होतो व राज्यात 7 जून रोजी त्याचे आगमन होते. 

दरम्यान, गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षे केरळमधील पाऊस वेळापत्रकापेक्षा 6 ते 8 दिवस उशिराने दाखल झाल्याचे दिसून आले आहे. सन 2014 मध्ये 6 जून, सन 2015 मध्ये 5 जून, सन 2016 मध्ये 8 जून, सन 2017 मध्ये 30 मे व सन 2018 मध्ये 29 मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, केरळमधील मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे राज्यातही तो उशिराने दाखल होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

राज्यात 12 जून रोजी मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पुणे, मुंबईत तो 14 किंवा 15 जून रोजी डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटे येथे तो 18 किंवा 19 जून रोजी दाखल होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.