Wed, Jun 26, 2019 16:09



होमपेज › Pune › तेरा खंडणीबाजांना मोक्का

तेरा खंडणीबाजांना मोक्का

Published On: May 23 2019 1:43AM | Last Updated: May 23 2019 1:55AM




बारामती : प्रतिनिधी
राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील 13 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ही माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यावेळी उपस्थित होते.

खंडणी प्रकरणात सचिन ज्ञानेश्वर पडळकर (वय 30, रा. पिलिव, पडळकर वस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर), डॉ. इंद्रकुमार देवराज भिसे (वय 42, रा. पेरीयार भवन, खरामळा, ता. शिरुर), दत्तात्रय पांडुरंग करे (वय 34, रा. करे वस्ती, सदाशिवनगर, ता. माळशिरस), विकास शिवाजी अलदर (वय 34, रा. आडेगाव, ता. माढा), तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे (वय 26, रा. माळेगाव, ता. माढा), बिरुदेव लक्ष्मण कारंडे (वय 23, रा. माळेगाव, ता. माढा), सुशांत दादासाहेब करे (वय 19, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा), दीपक विठ्ठल जाधव (वय 21, रा. वडजल, ता. माण), नितीन राजेंद्र पिसे (वय 23, रा. म्हसवड, ता. माण) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

दि. 9 मे रोजी आरोपींना खंडणीची रक्कम स्वीकारताना बारामतीत अटक करण्यात आली होती. अण्णासाहेब बळवंत रूपनंवर (वय 54, रा. कुरबावी, ता. माळशिरस) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरील आरोपींनी 4 मे रोजी बारामतीतील कृष्णसागर हॉटेलमध्ये, तर 6 मे रोजी स्वारगेट येथील नटराज हॉटेलात फिर्यादीला बोलावून जानकर व दोडतले यांची बदनामीकारक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू, दोडतले यांना मारहाण करून त्यांचे हातपाय तोडू अशी भीती दाखवून फिर्यादीलाही या प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला 50 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तडजोडीअंती 30 कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यातील 15 कोटींचा पहिला हप्ता देताना बारामतीत आरोपींना पकडण्यात आले होते. 

चौघांना अद्याप अटक नाही

अटकेतील 9 जणांसह जगन्नाथ जानकर (रा. पळसावडे, ता. माण),  विनायक मासाळ व राजू अर्जुन आणि रमेश कातुरे (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचाही संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. या चौघांची पूर्ण नावे पोलिसांकडे नाहीत आणि अद्याप त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.