Fri, Apr 26, 2019 20:00होमपेज › Pune › महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड

Published On: Sep 14 2018 3:53PM | Last Updated: Sep 14 2018 4:04PMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे सर्वाधिक मते मिळवून प्रदेशाध्यक्षपदी निवडून आले आहेत. आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेत उपाध्यक्ष निवडून आले. त्याचबरोबर कुणाल राऊत हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून  ६० युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील तयार झाली आहे. 

सत्यजीत तांबे यांच्या निवडीने युवक कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना ७० हजार १८९ मते मिळाली. तर उपाध्यपदी निवडून आलेले आमदार झनक यांना ३२ हजार ९९९ मते तर कुणाल राऊत यांना ७ हजार ७४४ मते मिळाली. सत्यजीत तांबे हे ३७ हजार १९० मताधिक्याने निवडून आले.

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून ते एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी केली आहे. 

तांबे यांनी या अगोदर दोन वेळा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. नागरी विकास, अंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. सत्यजित तांबे यांच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन विद्यमान भाजपा सरकार विरोधात संघर्ष करू शकणारा आश्वासक चेहरा युवक काँग्रेसला मिळाल्याचे बोलले जाते आहे.