Mon, Sep 16, 2019 05:40होमपेज › Pune › ‘बालगंधर्व पाडू नका; अन्यथा वात्रटिकांचा हल्लाबोल करू’

‘बालगंधर्व पाडू नका; अन्यथा वात्रटिकांचा हल्लाबोल करू’

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 12:51AMप्रसाद जगताप

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची संकल्पना आणि अलौकिक प्रतिभेचे संगीत नट बालगंधर्व यांची स्मृती असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत सध्या शहरात वादंग चालू आहे. या प्रश्‍नावर आता नाट्यकर्मी, बालगंधर्व रंगमंदिर कर्मचारी यांसह साहित्य क्षेत्रातही नाराजीचे सूर उमटल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी ‘बालगंधर्व पाडू नका; अन्यथा वात्रटिकांचा हल्लाबोल करू,’ असा कडक इशारा दिला आहे.

सध्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासन बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी ‘पुलं’च्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. बालगंधर्व रंगमंदिर पाडून जन्मशताब्दी वर्षात ‘पुलं’ना अभिवादन करणार का, अशा शब्दात साहित्यिकांची पंढरी असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेनेदेखील, बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या कल्पनेला विरोध केला आहे.

बालगंधर्व रंगमंदिर हा ऐतिहासिक ठेवा आहे. बालगंधर्वची ही वास्तू ‘पुलं’च्या कल्पनेचे एक रोपटे आहे. या नाट्यगृहाला पाहूनच इतर नाट्यगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील झाडांची संकल्पनादेखील उत्तम आहे. पुनर्विकासादरम्यान येथील झाडेसुद्धा पाडली जाणार आहेत. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचा आराखडा नकोच. तसेच बालगंधर्व रंगमंदिराचे जतन व्हायला हवे, असे वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

तसेच बालगंधर्व नाट्यमंदिरात नाट्यरसिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने त्या समस्या सोडविण्यावर भर द्यायला हवा. बालगंधर्व रंगमंदिराला घुशी लागल्याचे अनेक जणांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. त्यासाठी  पालिका प्रशासनाने उपाययोजना करायला हव्यात. बालगंधर्व नाट्यगृहाच्या भोवताली 10 फूट खड्डा खणून त्यात काँक्रिटीकरण केल्यास घुशींची समस्या संपुष्टात येईल, असेही ते म्हणाले.