Sun, Apr 21, 2019 06:08होमपेज › Pune › ‘त्या’ जमिनी देवस्थान संस्थानाच्या नावे करा

‘त्या’ जमिनी देवस्थान संस्थानाच्या नावे करा

Published On: Nov 09 2018 6:12PM | Last Updated: Nov 10 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील देवस्थानच्या जमिनीची तपासणी करून बेकायदेशीरपणे हस्तांतरित झालेल्या जमिनी पूर्ववत संबंधित देवस्थान संस्थानाच्या नावे करा, असा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्यामुळे ज्या देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाल्या आहेत, त्यांचे धाबे दणाणले असून, सहा महिन्यांमध्ये अर्थ-न्यायिक कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे ही आदेशात नमुद केले आहे.

राज्यातील देवस्थान जमिनीचे हस्तांतरण बेकायदेशीरपणे व शासनाच्या परवानगीशिवाय होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार इनाम जमिनीच्या तपासणीची मोहीम जिल्हास्तरावर राबवण्याचे आदेश २०१० साली महसूल विभागाने दिले होते. त्यावेळी काहीजण न्यायालयात गेले होते. त्यात न्यायालयाने क्षेत्रीय पातळीवर कार्यरत महसूल प्राधिकारी व अधिकारी यांना देवस्थान जमिनीचा शोध घेणे किंवा अशा जमिनींच्या व्यवस्थापकांना आणि प्रशासकांचा शोध घ्या, असे आदेश दिले होते. 

देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे निदर्शनास आलेल्या प्रकरणांपैकी पुनरिक्षणात दाखल करून घेतलेल्या प्रकरणांपैकी प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत. ज्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशा प्रकरणांमध्ये सहा महिन्यांमध्ये अर्ध-न्यायिक कार्यवाही पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा, असे निर्देश महसूल विभागाकडून देण्यात आले आहे.