Wed, Jun 03, 2020 04:48होमपेज › Pune › पदपथांवरील स्टॉलविरोधात व्यावसायिक आक्रमक(video)

पदपथांवरील स्टॉलविरोधात व्यावसायिक आक्रमक(video)

Published On: Jun 12 2019 8:49PM | Last Updated: Jun 12 2019 9:06PM
पुणे : प्रतिनिधी

‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केलेल्या बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते मित्रमंडळ चौकादरम्यानच्या पदपथावर उभारण्यात आलेल्या स्टॉलविरोधात परिसरातील व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पदपथांवर बाहेरील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय 48 तासांत मागे न घेतल्यास ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा स्थानिक व्यावसायिकांनी दिला आहे. दुसरीकडे या ठिकाणी पुनर्वसन केल्या जाणार्‍या स्टॉलधारकांनी आपले पुनर्वसन नव्याने होणार्‍या मेट्रो स्टेशनमध्येच करण्याची मागणी केली आहे. 

स्वारगेट परिसरात मेट्रो स्टेशन आणि ट्रान्झिट हबचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी स्वारगेट परिसरातील 44 स्टॉल्सधारकांचे स्थलांतर करण्यात आले आहेत. या स्टॉलधारकांचे मित्रमंडळ चौकातील पाटील प्लाझासमोरील पदपथावर आणि सनस मैदानाजवळील छत्रपती शिवाजी उद्यानाजवळील पदपथावर पुनर्वसन करण्यात येत आहे. यासाठी पदपथावर स्टॉल्स उभे करण्यात आले आहेत. दरम्यान या पुनर्वसनास पाटील प्लाझा आणि परिसरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला आहे. 

यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत येथील व्यावसायिक अंकुश भोसले म्हणाले, बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते मित्रमंडळ चौकादरम्यानचा रस्ता महापालिकेने ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केला आहे. पाटील प्लाझासमोरील पदपथावर बेकायदेशीरपणे स्टॉल्स आणून ठेवले आहेत. हे स्टॉल्स सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ ठेवण्यात येणार होते; परंतु तेथे विरोध झाल्यानंतर याठिकाणी हलविण्यात आले आहे. हे पुनर्वसन स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे याला आमचा विरोध असून, हे स्टॉल्स दोन दिवसात हालविण्यात यावेत. तसेच येथील पुनर्वसनाचा निर्णय मागे न घेतल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे. यामध्ये पालिकेच्या अधिकार्‍याने आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप भोसले यांनी यावेळी केला.