Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Pune › ‘डिलक्स’पाठोपाठ ‘अरुण’ही पडद्याआड

‘डिलक्स’पाठोपाठ ‘अरुण’ही पडद्याआड

Published On: Nov 15 2017 2:51AM | Last Updated: Nov 15 2017 2:51AM

बुकमार्क करा

पिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहाला उतरती कळा लागली आहे. पिंपरीतील डिलक्स चित्रपटगृहापाठोपाठ दापोडीतील अरुण चित्रपटगृहही काळाच्या पडद्याआड लुप्त झाले आहे. त्या ठिकाणी अद्ययावत दर्जाचे दोन स्क्रिनचे मल्टिप्लेक्ससह शो-रूम उभारले जाणार आहे. त्यामुळे शहरात आता केवळ जयश्री व अशोक ही दोनच सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे उरली आहेत.   

सध्याच्या स्पर्धेच्या काळात मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची चलती सुरू आहे. एका इमारतीमध्ये एकूण 100 ते 200 आसनक्षमतेची दोन ते चार स्क्रिनची मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे उभारून अव्वाचा सव्वा तिकीट दर लावून आपला गल्ला वाढविण्याचा धंदा तेजीत आहे.  परिणामी, सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे ओस पडत चालली आहेत. सुविधांचा आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, सुमार दर्जा आदी कारणांमुळे सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्याचा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी असा प्रेक्षकवर्ग मर्यादित राहिला आहे. त्यामुळे तिकीट दर कमी असूनही, नियमित प्रतिसादाअभावी तिकीट बारीवरील व्यवहार थंडावून सदर चित्रपटगृहे तोट्यात चालली आहेत. त्यामुळे चित्रपटगृहाचा व्यवसाय  पांढरा हत्ती पोसण्यासारखे ठरत आहे. 

शहरात पिंपरी कॅम्पातील अशोक आणि चिंचवड स्टेशन येथील जयश्री ही दोनच सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे सध्या सुरू आहेत. पिंपरी कॅम्पातील डिलक्सपाठोपाठ दापोडीतील अरुण चित्रपटगृहाला टाळे लागले आहे. ‘अरुण’ हे दापोडी, फुगेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, बोपोडी, खडकी परिसरातील सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्गासाठी परवडणार्‍या दरातील हक्काचे चित्रपटगृह होते. ते शहरातील सर्वाधिक दीड हजार आसनक्षमता असलेले चित्रपटगृह होते. तेही बंद झाल्याने या परिसरातील सर्वसामान्य प्रेक्षकवर्गाचा मनोरंजनावर गदा आली आहे. त्या ठिकाणी अद्ययावत पद्धतीने दोन स्क्रिन चित्रपटगृह आणि शो-रूम उभारले जाणार आहे. त्यास किमान 3 वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खडकी रेल्वे स्टेशन येथील जयहिंद चित्रपटगृह बंद होऊन दीड वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, एक आशादायी बाब म्हणजे खडकी बाजारातील न्यू एक्सेलसिअर चित्रपटगृह तब्बल 13 वर्षांनंतर नुकतेच ‘व्हीलक्स’ या नव्या रूपात सुरू झाले आहे. परिणामी, दापोडी, फुगेवाडी, सांगवी, खडकी, विश्रांतवाडी, कळस या परिसरातील प्रेक्षकवर्ग समाधान व्यक्त करीत आहे.