Sun, Mar 24, 2019 02:24होमपेज › Pune › पुणेः रुग्णालयातच जादूटोणा, महिलेचा नाहक बळी(Video)

पुणेः रुग्णालयातच जादूटोणा, महिलेचा नाहक बळी(Video)

Published On: Mar 13 2018 3:41PM | Last Updated: Mar 14 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या महिला रुग्णावर उपचारासाठी खासगी डॉक्टरने परस्पर मांत्रिकास आणले. यानंतर मांत्रिकाद्वारे फुले व इतर वस्तू डोक्यापासून पायापर्यंत सहा वेळा उतरून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 
संध्या गणेश सोनवणे (24, रा. दत्तवाडी, सिंहगड रोड) असे तिचे नाव असून, सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी जादूटोणा असल्याचा आरोप करीत मांत्रिक व त्याला बोलावणारा रुग्णालयाच्या बाहेरील डॉ. सतीश चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
हा प्रकार घडल्याचे दीनानाथ रुग्णालयाने मान्य केले असून, रुग्णालयाचे डॉक्टर व इतर कर्मचारी यांचा या घटनेशी संबंध नसल्याचे सांगितले. 

या मांत्रिकाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.यानंतर संध्या यांचा भाऊ महेश जगताप याने याबाबत रुग्णालय, डॉक्टर व मांत्रिक यांच्यावर मंगळवारी आरोप केले व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

महेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी संध्या यांच्या छातीला दुधाची गाठ झाल्याने त्यांना उपचारासाठी स्वारगेट चौकातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे नेले होते. तेथील डॉक्टरांनी एक ते दोन वेळा शस्त्रक्रियाही केली; तसेच पट्टी करण्यासाठी त्या दररोज चव्हाण नर्सिंग होम या हॉस्पिटलला जात होत्या. अखेर दि. 20 फेब्रुवारीला  त्यांच्यावर शेवटची शस्त्रक्रिया करण्यात आली.  यावेळी मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाल्याने डॉ. चव्हाण यांनी संध्या यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागेल असे सांगत त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पाठवलेे, असे महेश यांनी सांगितले.
 
यानंतर दि. 21 फेब्रुवारीला दीनानाथ रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात संध्या यांना दाखल केले. तेथे त्यांच्यावर डॉ. समीर जोग यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना डॉ. सतीश चव्हाण हे भेटायला येत. त्यांनी परस्पर एका मांत्रिकाला बोलावून रुग्ण बरा होईल असे सांगून जादूटोण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप  महेश जगताप यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी याचा व्हिडिओदेखील नातेवाईकांनी रेकॉर्ड केला आहे. मात्र यामध्ये रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टरचा सहभाग नसून डॉ. जोग यांनी चांगले उपचार केल्याचे महेश यांनी सांगितले. 
शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्‍त केला आहे. रुग्णालयात मांत्रिक येऊन हळद-कूंकु वाहतो कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसेच डॉ. चव्हाण यांनी मला हे प्रकरण दाबण्यास सांगितले होते, असा आरोप तावरे यांनी केला. तर अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारी अध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पोलिसांनी याबाबत स्वतःहून तक्रार दाखल करावी आणि चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 

डॉ. चव्हाण यांचा बोलण्यास नकार
   स्वारगेट येथील डॉ. सतीश चव्हाण यांचे रुग्णालय मंगळवारी बंद होते. त्यांना दूध्वनीवरून संंपर्क केला असता त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत काही एक बोलण्यास नकार दिला; तसेच त्यांना अज्ञात व्यक्‍तीने सोमवारी धमकावल्याप्रकरणी त्यांनी खडक पोलिसांकडे अर्ज दिला आहे.  

रुग्णाचा मृत्यू हा विविध अवयव निकामी झाल्याने झाला आहे. त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
  - डॉ. समीर जोग, इंटेन्सिव्हिस्ट (रुग्णाचे डॉक्टर)
  
याबाबत संध्या यांचे भाऊ महेश जगताप यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. सतीश चव्हाण व एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
- रेखा साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अलंकार पोलीस ठाणे