होमपेज › Pune › जेजुरीजवळ का झाला ‘उलटा पाऊस’?

जेजुरीजवळ का झाला ‘उलटा पाऊस’? (Video)

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:49AMपुणे : शिवाजी शिंदे

पाऊस म्हणजे आकाशातून पृथ्वीला झालेला निसर्गाचा अभिषेकच जणू! तो नेहमीच ढगातून जमिनीवर कोसळतो. पण शुक्रवारी जेजुरीजवळ धरणातून आकाशात उलटा पाऊस झाला, या जलधारा थेट ढगांना जाऊन भिडल्या. काय होता हा चमत्कार? तज्ज्ञांनी हे गूढ उलगडून दाखवले.वार्‍याच्या उलट्या दिशेने तयार झालेले चक्रीवादळ व त्याच्या आत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जेजुरीजवळील नाझरे धरणाचे पाणी गोल फिरत ढगांपर्यंत गेलेले दिसले. ही प्रक्रिया नैसर्गिकच असून, मान्सूनपूर्व पावसाच्या वेळी वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्याने ही घटना घडली. मान्सूनपूर्व पावसादरम्यान अशा प्रकारच्या घटना घडतच असतात, अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितली.

जेजुरीजवळ असलेल्या नाझरे धरणामध्ये शुक्रवारी चक्रीवादळ होऊन धरणामधील पाणी उंच उडाले होते. त्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर सुमारे तास ते दीड तास या भागात मुसळधार पाऊस झाला. या दीड तासात साधारपणे  95 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. 

‘पुढारी’ प्रतिनिधीने हवामानतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली असता, ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया असून, यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले. याबाबत माहिती देताना हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे म्हणाले, मान्सूनपूर्व आणि मान्सूनउत्तर काळात वातावरणामध्ये अस्थिरता असल्याने चक्रीवादळे तयार होतात. 

वार्‍याच्या उलट्या दिशेने वादळ तयार झाल्यानंतर बहुतांशी वेळा यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो. या पट्ट्यामुळे वार्‍याचा वेग सरासरीपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढत जातो. परिणामी जमिनीवरील कोणतीही वस्तू या चक्रीवादळामुळे हवेत फेकली जाते. शुक्रवारी नाझरे धरणातील पाणी ढगांच्या दिशेने आकाशात उंच फेकले गेले त्याचे कारण हेच आहे. वास्तविक पाहता राज्यात अशा प्रकारच्या घटना फारशा घडत नाहीत. मात्र, उत्तर अमेरिका तसेच दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत मान्सूनपूर्व पावसाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळे, तसेच कमी दाबाचे पट्टे तयार होतात. त्यामुळे अशा प्रकरच्या घटना तेथे वारंवार घडत असतात. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर बहुतांशी वेळा ढगफुटीसदृश पाऊस पडतो. त्यामुळे जेजुरी येथे घडलेली घटना ही नैसर्गिकच आहे. 

याबाबत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, मान्सूनपूर्व  पावसामुळे चक्रीवादळ, तसेच हवेच्या वरच्या भागात कमी दाबाचे पट्टे तयार होतात. या प्रक्रियेमुळे जमिनीवरील कोणतीही वस्तू आकाशात उंच उडते. जेजुरी येथील नाझरे धरणातील पाणी शुक्रवारी उंच उडाले, हे पाणी  चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच उडाले आहे. ही पूर्णत: नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर अमेरिका, आफ्रिका या देशांमध्ये अनेक वेळा चक्रीवादळे आणि कमी दाबाचे पट्टे तयार होतात. परिणामी समुद्रातील पाणी उंच उडण्याबरोबरच मासेही उडालेले आहेत. अशा प्रकारच्या घटना दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत मान्सूनपूर्व पावसाच्या दरम्यान वारंवार घडत असतात.

दै.‘पुढारी’ची बातमी  व्हायरल

नाझरे धरणामध्ये उलट्या चक्रीवादळाच्या चमत्काराचे दै.‘पुढारी’त शनिवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. दै. ‘पुढारी’ची ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे वृत्त व बातमीदाराने काढलेला व्हिडिओ दिवसभर व्हायरल झाला. या व्हिडिओ आणि बातमीची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.


 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex