Fri, Jan 24, 2020 16:48होमपेज › Pune › पुण्यावर पाणीकपातीचे संकेत?

पुण्यावर पाणीकपातीचे संकेत?

Published On: Dec 06 2018 6:27PM | Last Updated: Dec 06 2018 6:27PM
पुणे : प्रतिनिधी

खडकवासला धरणात गत वर्षाच्या तुलनेत २० टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी पाणी जपुन वापरणे गरजेचे आहे. पाण्याचा मुबलक वापर सुरूच ठेवला तर मे - जुनमध्ये धरण कोरडे पडेल. त्यामुळे आत्तापासून काहीतरी उपाय करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत पालकमंत्री गिरीष बापट यांनी शहराच्या पाणी साठ्यात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी पाणी कपातीचे संकेत दिले. 

यावेळी बापट म्हणाले, यंदा पाऊस कमी पडल्याने आणि परतीचा पाऊन न आल्याने धरणात २० टक्के पाणीसाठा कमी आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा करुन बेबी कॅनॉल आणि खडकवासला धरणातून सुरू होणारा उजवा कॅनॉल दुरूस्त करुन गळती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काही दिवस दोन्ही कॅनॉल बंद ठेवावे लागतील. ही दुरुस्ती केल्यानंतर ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. 

मात्र त्यापूर्वी सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे. दहा दिवसातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला तर २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघेत.  यासाठी शहरातील आमदार, खासदार, नगरसेवक एकत्र बसुन योग्य ते नियोजन करतील. यामुळे पाण्याचे कोणीही राजकारण करू नये. चर्चेतून सर्वच अडचणींवर मात करता येत, असेही ते यावेळी म्हणाले. टेमघर धरणाचे पाणी कोणालाही दिले गेले नाही. त्याचा वापर नागरिकांसाठीच करण्यात आला आहे. दुरूस्तीसाठी धरण मोकळे करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.