Mon, Sep 16, 2019 12:21होमपेज › Pune › बहिणींचा आजही पोस्टाने राखी पाठविण्याकडे कल

बहिणींचा आजही पोस्टाने राखी पाठविण्याकडे कल

Published On: Aug 22 2018 1:24AM | Last Updated: Aug 21 2018 10:40PMपिंपरी : पूनम पाटील

भावा-बहिणीच्या नात्याला अधिक दृढ करणारा सण ‘रक्षाबंधन’ अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय. भावांना राख्या पाठवण्यासाठी बहिणींची लगबग सुरू आहे. त्यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, मासूळकर कॉलनी, कासारवाडी आदी विविध भागातील पोस्ट कार्यालयात राख्या पाठविण्यासाठी महिलावर्गाची प्रचंड गर्दी होत आहे. दररोज जवळपास तीनशे ते चारशे राख्या पाठवल्या जात असून दिवसेेंदिवस ही गर्दी वाढतच आहे. त्यामुळे या डिजिटल युगातही बहिणींचा राख्या पाठवण्यासाठी पोस्टावर अधिक भरवसा असल्याचे चित्र सध्या सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये पहायला मिळत आहे. 

शहरातील बहीणींची सध्या रक्षाबंधनासाठी लगबग सुरू असून पोस्ट ऑफिसमध्ये राख्या पाठवण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. राखीची ही परंपरा सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यातही सुरू आहे. सध्या प्रत्येक सणवाराला सोशल मीडियाद्वारे ग्रीटिंग्ज पाठवल्या जातात. परंतु दूरवरच्या भावाला राखी वेळेत पोहाचावी, यासाठी  शहरातील  पोस्ट ऑफिस कार्यालयांत राखी पोस्टाने पाठविण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी किंवा दूरदेशी गेलेल्या भावाला राखी वेळेत पोहचावी, यासाठी पोस्टात विशेष गर्दी  होत आहे. 

राख्यांसाठी खास ट्रेची व्यवस्था

पोस्ट कार्यालयात सध्या तरी राख्या पाठवण्यासाठी स्पेशल काउंटर सुरू करण्यात आलेले नाही. पण गर्दी वाढली तर एक्स्ट्रा काउंटर सुरू करतो. राख्यांसाठी वेगळी व्यवस्था  केली आहे.  साध्या राख्या पाठवण्यासाठी ट्रेची व्यवस्था केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळे ट्रे ठेवले आहेत.  पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरसाठी वेगळे असे पाच ट्रे ठेवले आहेत.  मनुष्यबळ मर्यादित असल्याने गर्दी वाढली की, एखादा काउंटर बंद ठेवून तिथला कर्मचारी राख्या पाठवण्याकामी मदत करत असतो,  अशी माहिती पोस्टमास्तरांच्या वतीने देण्यात आली.