होमपेज › Pune › सुरक्षिततेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची

सुरक्षिततेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची

Published On: Mar 27 2019 1:56AM | Last Updated: Mar 27 2019 1:36AM
पुणे : प्रतिनिधी

भारतीय सैन्याने केलेले सर्जिकल स्ट्राइक जगाने मान्य केले. पण, काँग्रेस पक्ष याबाबत पुरावे मागत शत्रूला मदत करणारी भाषणे करीत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची भाषणे भारतात नाही तर पाकिस्तानात जास्त गाजत आहेत, अशी खोचक टीका करीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँगे्रसच्या धोरणांवर हल्‍ला चढविला. तसेच ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, नरेंद्र मोदी हे मजबूत, स्थिरतेचे, सुरक्षिततेचे व विकासाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.  

भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटक पक्षांच्या महायुतीचे लोकसभेचे  पुण्यातील उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पहिल्या प्रचार सभेचा नारळ प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्‍ता टिळक अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी विद्यमान खासदार अनिल शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रकांत मोकाटे, माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्यासह युतीचे नगरसेवक व घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस रवी दिघे व हिंदू एकता संघटनेचे प्रमुख विलास तुपे यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. 

नरेंद्र मोदींप्रमाणेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही जगातील इतर देशांचे दौरे केले; पण प्रभाव काहीच पडला नाही. परंतु मोदी यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या साडेचार वर्षांत भारत आर्थिक स्थितीत जगात अकराव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आला. काँग्रेसने केवळ गरिबी हटविण्याचा नारा दिला, परंतु मोदींनी गरिबी हटविण्यासाठी समृध्दी जरूरी असल्याचे ओळखून तशी पावले उचलली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. 

इतर पक्षात विद्यमान पदाधिकार्‍यास उमेदवारी मिळाली नाही तर खुर्च्या फेकल्या जातात, पण अनिल शिरोळे यांनी बॅटन रिलेप्रमाणे विजयाचा बॅटन आपल्याकडून बापट यांच्याकडे दिला आहे. आजच्या सभेसह देशातील 554 सभा या विजयाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या असल्याचेही जावडेकर म्हणाले. 

या वेळी बापट यांनी केलेल्या कामाची माहिती देत, पुण्याच्या विकासात कोथरूडकरांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले. पुण्यात चोवीस तास पाणी, गतीने होणारे मेट्रोचे काम, जायका प्रकल्प, कचरा प्रकल्प, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्गाची कामे आदींबाबत गेल्या काही वर्षांत जोर धरला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

‘पुणे तेथे काँग्रेस उणे...’

‘पुणे तेथे काय उणे’ म्हणतात, पण आता या निवडणुकीनंतर ‘पुणे तेथे काँग्रेस उणे’ म्हणावे लागेल, असे काम आपण पुण्यातील चारही जागा विजयी करून दाखवून देऊ, असा विश्‍वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी या वेळी व्यक्‍त केला. या वेळी शशिकांत सुतार, खासदार अनिल शिरोळे, योगेश गोगावले आदिंचीही भाषणे झाली.