Wed, Feb 26, 2020 19:27होमपेज › Pune › ‘डीएसके’मध्ये गुंतवणूक केलेल्या वृद्धाची आत्महत्या

‘डीएसके’मध्ये गुंतवणूक केलेल्या वृद्धाची आत्महत्या

Last Updated: Jan 19 2020 1:38AM
पुणे / मुंढवा : प्रतिनिधी
डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकाने अखेर नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. तानाजी गणपत कोरके (61, रा. भीमनगर, आंबेडकर हायस्कूलसमोर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

तानाजी कोरके यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत 4 लाख रुपये गुंतवणूक केली होती. त्याची मुदत 2017 मध्येच संपली; मात्र त्याचे व्याज आणि मुद्दल त्यांना परत मिळालेले नाही. त्यामुळे मुलीचे लग्‍न करू शकत नसल्याची खंत त्यांना होती. त्यातून त्यांनी गुरुवारी (दि. 16) रात्री घरातील सर्वजण झोपल्यावर दोरीने घरातील फॅनच्या अँगलला गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 17) पहाटे साडेचार वाजता घरातील लोक उठले असता उघडकीस आला.

आत्महत्या करण्यापूर्वी कोरके यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली दिसून आली. त्यात त्यांनी ‘डीएसके’मध्ये गुंतवलेले पैसे परत मिळत नाहीत आणि मुलीचे लग्‍नही करू शकत नसल्याने आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये, असेही म्हटले आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी 2 हजार 43 कोटींचा घोटाळा केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले. डीएसकेंविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

डी. एस. कुलकर्णी सध्या येरवडा कारागृहात आहेत. डीएसकेंनी 2 हजार 43 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यासह गुन्ह्याशी संबंधित त्यांचे नातेवाईक आणि कंपनीतील अधिकारीवर्गावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.

शेकडो नागरिकांची गुंतवणूक
डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिकसह अनेक शहरांतील नागरिकांनी कोट्यवधी रुपये गुंतवलेले आहेत.  त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. अनेकांनी निवृत्तीनंतर मिळणारे पैसे डीएसके यांच्या कंपनीत गुंतविले आहेत. त्यातून मिळणार्‍या मासिक व्याजावर आपला खर्च भागविण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, डी. एस. कुलकर्णी यांनी हे पैसे व्यवसायात न लावता इतरत्र वळवले. त्यातून लोकांची देणी देणे शक्य न झाल्याने त्यांना गेल्या वर्षी फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीसह अटक झाली.

डीएसके यांच्या अडचणीत वाढ
डीएसके यांचा बांधकाम प्रकल्प म्हाडाने विकसित करण्यासाठी घ्यावा, यासाठी डीएसकेंच्या सध्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत असून त्यांची जामिनासाठीही धडपड सुरू आहे. फुरसुंगी येथील फसलेला ‘ड्रीमसिटी’चा प्रकल्प म्हाडाकडे वळविण्यासाठी त्यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. यापूर्वी सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला असून प्रकल्प म्हाडाकडे वर्ग करण्याचीही याचिका सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. त्यातच पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदाराने आत्महत्या केल्याने डीएसके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.