Mon, Jun 17, 2019 11:03होमपेज › Pune › पोलिसांनी ‘डीएनए’साठी पुरलेले बाळ उकरले

पोलिसांनी ‘डीएनए’साठी पुरलेले बाळ उकरले

Published On: Jan 13 2019 1:39AM | Last Updated: Jan 13 2019 1:39AM
पिंपरी : 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यामुळे तिची गर्भधारणा झाली. मुलीने मृत बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाची परस्पर विल्हेवाट लावली. कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणात पोलिस स्वतः फिर्यादी झाले अन् त्यांनी तपास सुरू केला. बाळाची ‘डीएनए’ टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी पिंपरीतील  स्मशानभूमीमध्ये पुरलेले बाळ उकरून बाहेर काढले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत बाळाला जन्म दिला. मुलीच्या पालकांनी बदनामीच्या भीतीने त्या बाळाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, वूमेन हेल्पलाइनच्या महिला अत्याचार विरोधी समितीच्या अध्यक्षा नीता परदेशी यांना माहिती मिळाली. त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी पिंपरी पोलिसांना निवेदन दिले.

त्यानंतर घोडेगाव पोलिसांनी रुग्णालयात पीडित मुलगी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला. पोलिसांनी समजूत घालूनही मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी तयार झाले नाहीत. शेवटी या प्रकरणात पोलिस स्वतः फिर्यादी झाले व तपास सुरू केला. आरोपीला शिक्षा होण्यासाठी पीडित मुलीचे बाळ हा मोठा पुरावा पोलिसांकडे होता. त्यामुळे पोलिसांनी पिंपरी स्मशानभूमीत पुरलेले बाळ तहसीलदारांसमक्ष बाहेर काढले. ‘डीएनए’साठी नमुने घेतल्यानंतर पोलिसांनी पुन्हा ते बाळ विधीपूर्वक दफन केले. पोलिसांचा तपास पाहून पीडित मुलगी आणि तिच्या पालकांना विश्वास वाटू लागला. पोलिसांचा तपास सुरू झाल्यानंतर पीडित मुलीने जबाब बदलला. तिने अत्याचार झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पुन्हा नव्याने जबाब नोंदविल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.