Sun, Jul 05, 2020 11:47



होमपेज › Pune › मुंबईसह कोकण किनारपट्टीला  आज धडकणार चक्रीवादळ

मुंबईसह कोकण किनारपट्टीला  आज धडकणार चक्रीवादळ

Last Updated: Jun 03 2020 1:01AM

संग्रहित छायाचित्र



पुणे ः पुढारी वृत्तसेवा

बंगालच्या उपसागरातून ‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ दक्षिण गुजरात, कोकण व उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड वेगाने निघाले असून, ते कोकणात बुधवारी, 3 जून रोजी दुपारी पोहोचणार आहे. या वादळाचे रूपांतर अवघ्या काही तासांत महाचक्रीवादळात होणार असल्याने ते मुंबईलाही धडकण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) दिल्लीने मंगळवारी दुपारीच महाराष्ट्र व गुजरात राज्यांना ‘निसर्ग’ महाचक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हे वादळ 3 जून रोजी दुपारी 3 च्या सुमारास दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा मुक्‍काम कोकण व उत्तर महाराष्ट्रात 24 तास राहणार असल्याने अतिदक्षतेचा इशारा कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्राला दिला आहे.

मोठ्या नुकसानीचा इशारा

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व भागांना मोठे नुकसान होऊ शकते. पूर, वीजतारांचे मोठे नुकसान, झाडपडी, केळी, पपईच्या बागा व समुद्री पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

इतिहासात प्रथमच

मुंबईला महावादळ

या वादळाचा वेग गुजरात व महाराष्ट्रात येईपर्यंत ताशी 100 ते 120 कि.मी. इतका वाढणार असून, महाराष्ट्रात दुपारी 2 ते 4 च्या सुमारास हे चक्रीवादळ येणार आहे. याचा वेग कर्नाटकपर्यंत ताशी 60 ते 80 कि.मी.  राहील, तेथून पुढे मात्र याचा वेग ताशी 100 ते 120 कि.मी.वर जाईल.हे वादळ प्रथमच राज्याची राजधानी मुंबईला मोठा फटका देण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रणगुरी, नाशिक, तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबारला प्रचंड वारे, विजांच्या कडकडाटासह मोठा पूर येऊ शकतो.

कोल्हापूर, सांगली, सातार्‍यात अतिवृष्टी

महाचक्रीवादळाचा फटका 3 जूनला कोकणात बसणार, त्यामुळे त्याचा प्रभाव दहा कि.मी. परिसरात राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

• इतिहासात प्रथमच मुंबईला

   महावादळ धडकणार

• ठाणे, पालघर, अलिबाग,        रत्नागिरी, रायगड, नाशिक,        धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना
   अतिदक्षतेचा इशारा