Fri, Sep 20, 2019 22:15होमपेज › Pune › जित्याच्या अंत्यसंस्काराला नातेवाईकांसह मित्रांची पाठ

जित्याच्या अंत्यसंस्काराला नातेवाईकांसह मित्रांची पाठ

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 1:07AMपिंपरी : संतोष शिंदे

भोसरीत एकेकाळी दहशत माजवणार्‍या कुप्रसिद्ध गुंड जित्या पुजारी उर्फ जितेंद्र साळुंखेची मृत्यूनंतर केविलवाणी अवस्था झाली. कायम गुन्हेगारांचे टोळके सोबत घेऊन फिरणार्‍या जित्याच्या मृत्यूनंतर तब्बल तीन दिवसांनी त्याच्यावर पिंपरीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच्या अंत्यसंस्कारास त्याचा मामा आणि सोबतीचे दोघे असे तीन जणच उपस्थित होते. जित्याचा मामा योगेश जानकीराम कोळी यांनी दु:खी अंत:करणाने त्याच्या संबंधित काही कटू-गोड आठवणींचा ‘पुढारी’जवळ उलगडा केला.

जित्या सहा महिन्याचा असताना त्याची आई वारली. जित्याच्या बापाने दुसरे लग्न केले व त्यांना तीन अपत्ये झाली. जित्याचा बाप संसारात रमल्याने जित्याचे हाल होऊ लागले. जित्याचे हाल पाहून आजी (आईची आई) त्याला घेऊन आली. तो मामाच्या गावातच वाढला. तेथेच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीपर्यंत जित्या हुशार विद्यार्थी होता. त्याच्या वळणदार अक्षरामुळे तो शाळेत सगळ्यांचा लाडका होता. आजी वारली तसेच, मामाचे देखील हातावर पोट होते. जित्या मोठा झाला असल्याने त्याला आता कोणासाठी ओझे बनून रहायचं नव्हतं. पुण्यात येऊन एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करण्याचे त्याचे स्वप्न होेत. ते स्वप्न उराशी बाळगूनच तो पुण्यातील भोसरी येथील धावडेवस्तीत आला.

तिथेच त्याच्या आयुष्याला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली. पुण्यात आल्यानंतर गुंड गोट्या धावडेच्या टोळीत तो सहभागी झाला. त्याचे धाडस एवढे वाढले की, तो दिवसाढवळ्या गुन्हे करू लागला. काही दिवसातच जित्याच्या राहणीमानात तसेच वागण्यात खूप बदल झाल्याचे त्याच्या मामाला जाणवत होते. गावी आल्यानंतर तो गावात देखील  दादागिरी करत होता. मामाने त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. जित्याच्या एक मावसभाऊ आहे त्याच्यावर जित्याचे विशेष प्रेम होते. त्याने देखील कित्येकदा समजावले. सगळ्याचे समजावणे त्याला उपदेशाचे डोस वाटू लागल्याने त्याने गावी जाणे हळूहळू कमी केले. जित्याच्या शेवटच्या काळात जित्या कुणाच्याच संपर्कात नव्हता. तो त्याचाच दुनियेत धुंद होता. शेवटी या धुंदीतच त्याचा अंत झाला.