होमपेज › Pune › वंचित आघाडीचा महायुतीला फायदाच होणार : रामदास आठवले

वंचित आघाडीचा महायुतीला फायदाच होणार : रामदास आठवले

Published On: Apr 11 2019 2:09AM | Last Updated: Apr 11 2019 1:46AM
पुणे : प्रतिनिधी

वंचित बहुजन विकास आघाडी राज्यात जवळपास सर्वच जागा लढवीत आहे. परंतु या उमेदवारांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदाच होईल. त्यामुळे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.  

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ बुधवारी रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बापट, शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपाइंचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, अजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 

आठवले यांनी प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेवर यावेळी जोरदार टीका केली. मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची हवा होती. त्याविरोधात रान पेटवत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. यंदा नरेंद्र मोदी यांच्या विकासाची हवा आहे. त्यामुळे भाजपच्या खासदारांचा आकडा यंदा 272 च्या पुढे, महायुतीचे संख्याबळ 350 च्या पुढे जाईल, तर राज्यात युतीचे 40 च्या पुढे खासदार निवडून येतील असा मला विश्‍वास आहे. नोटाबंदीमुळे काहीजण दुखावलेही असतील, परंतु नोटाबंदीने काळा पैसा चलनात आला, याचा सर्वाधिक फायदा गरिबांना झाला आहे, असा दावाही आठवले यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते. त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले आहे. परंतु त्याचा युतीच्या मतांवर काही परिणाम होणार नाही, असेही आठवले यांनी नमूद केले. महायुतीमध्ये आपल्या पक्षाला उमेदवारी दिली नाही याबद्दल बोलताना आठवले म्हणाले, की आम्ही दक्षिण मुंबई आणि रामटेकची जागा मागितली होती. परंतु भाजप-शिवसेना युती झाल्याने जागा मिळू शकली नाही. 

राज्यसभेवर आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निश्‍चितपणे जागा देऊ, असे आश्‍वासन दोन्ही पक्षांकडून मिळाले आहे. हे दोन्ही पक्ष आश्‍वासन पूर्ण करतील याबाबत कुठलीच शंका नसल्याने मी युतीसोबत आहे, असे स्पष्टीकरण आठवले यांनी यावेळी दिले.

बापट हे समाजाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व

पालकमंत्री आणि उमेदवार असलेले गिरीश बापट हे तीन वेळा नगरसेवक आणि पाच वेळा आमदार झाले आहेत. त्यांचे समाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांशी आणि राजकीय कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. विशेषतः रिपाइंच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा चांगला स्नेह असून मार्गदर्शकही आहेत. त्यामुळे ते भरघोस मतांनी खासदार म्हणून निवडून येतील, असा विश्‍वास आहे