पुणे : प्रतिनिधी
महापालिकेबरोबर राज्य शासनाने कायमच दुय्यम भूमिका घेतल्यामुळे पीएमपीची वारंवार ससेहोलपट झाली. मागील दहा वर्षात एकाही अध्यक्षाने तथा व्यवस्थापकीय संचालकाने नियमानुसार तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. विशेष म्हणजे या दहा वर्षाच्या कालावधीत सुमारे आठ अधिकार्यांनी अतिरिक्त कार्यभार सांभाळला असल्याची बाब पुढे आली आहे.
‘पीएमपी’ ही पुणे आणि पिंपरी शहराची जीवनवाहिनी आहे. या जीवनवाहिनीच्या माध्यमातून सुमारे दहा लाख नागरिक रोज प्रवास करीत असतात. मात्र या पीएमपी स्थापनेपासून कायमच ससेहोलपट झालेली आहे. गेल्या दहा वर्षात आर. एन. जोशी या अधिकारर्याचा अपवाद वगळता कोणत्याही अधिकार्याने अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही.
आतापर्यंत पंधरा अधिकार्यांनी ‘पीएमपी’ची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र वारंवार बदल्या होत असल्यामुळे ‘पीएमपी’च्या मूळ प्रश्नाकडे कोणत्याही अधिकार्यास लक्ष देता आले नाही. त्यातही सुमारे आठ अधिकार्यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यामुळे पीएमपीची रूतलेली प्रगती अजूनही रूळावर आलेली नाही. त्यातच शहरातील राजकीय लोकप्रतिनिधी यांनी देखील ‘पीएमपी’साठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत.
‘पीएमपी’च्या स्थापनेपासून (2007) पासून आतापर्यत पदभार सांभाळलेले अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नावे आणि कार्यकाळ अनुक्रमे पुढीलप्रमाणे : सुब्बराव पाटील (दि. 26 ऑगस्ट 2007 ते 5 नोव्हेंबर 2008), अश्विनीकुमार (दि. 5 नोव्हेंबर 2008 ते 8 फेब्रुवारी 2009), नितीन खाडे (दि. 9 फेब्रुवारी 2009 ते 24 ऑगस्ट 2009), महेश झगडे (दि. 25 ऑगस्ट 2009 ते 7 सप्टेंबर 2009, अतिरिक्त पदभार), शिरीष कारले (दि. 7 सप्टेंबर 2009 ते 23 फेब्रुवारी 2010, अतिरिक्त पदभार), दिलीप बंड (दि. 23 फेब्रुवारी 2010 ते 3 जानेवारी 2011, अतिरिक्त पदभार), आर. एन. जोशी (दि. 3 जानेवारी 2011 ते 31 ऑक्टोबर 2014), आर. आर. जाधव (दि. 1 नोव्हेंबर 2014 ते 12 डिसेंबर 2014, अतिरिक्त पदभार),
श्रीकर परदेशी ( दि. 12 डिसेंबर 2014 ते 7 एप्रिल 2015, अतिरिक्त पदभार), ओमप्रकाश बकोरिया (दि. 7 एप्रिल 2015 ते 30 मे 2015, अतिरिक्त पदभार), कुणाल कुमार (दि. 30 मे 2015 ते 6 जून 2015, अतिरिक्त पदभार), अभिषेक कृष्णा (दि. 8 जून 2015 ते 8 जुलै 2016), कुणाल कुमार (दि. 8 जुलै 2016 ते 29 मार्च 2017, अतिरिक्त पदभार), तुकाराम मुंढे (दि. 29 मार्च 2017 ते 8 फेबु्रवारी 2018), नयना गुंडे ( दि. 12 फेब्रुवारी 2018 रोजी रूजू ).