Sun, Aug 18, 2019 06:02होमपेज › Pune › अकरा हजार जागांवरच शिक्षक भरती

अकरा हजार जागांवरच शिक्षक भरती

Published On: Feb 12 2019 1:25AM | Last Updated: Feb 12 2019 1:29AM
पुणे : प्रतिनिधी 

राज्यात 24 हजार जागांवर शिक्षक भरतीची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा हवेतच विरणार असून केवळ 10 हजार 800 जागांवर शिक्षक भरती होणार आहे. यातील माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या केवळ 2 हजार 300 जागा, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 8 हजार 500 जागांवर भरती होणार आहे. यासाठी साधारण 20 ते 22 फेब्रुवारीदरम्यान पवित्र पोर्टलवर जाहिरात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. 

खासगी संस्थांच्या भरतीत उमेदवारांना मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरतीत मात्र केवळ अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारे भरती होणार आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अल्पसंख्याक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळा, अनुकंपा तत्त्वावरील भरती या सर्व संस्थांमधील शिक्षक भरती पवित्र प्रणालीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षक भरतीच्या जागा कमी झाल्या आहेत. आता तब्बल 1 लाख 21 हजार उमेदवारांमधून केवळ 10 हजार 800 जागांवरच शिक्षक भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

रोष्टरचा घोळ मिटेना...

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीचे रोष्टर (बिंदुनामावली) पुढील आदेश येईपर्यंत अद्ययावत करू नयेत अशा प्रकारचे आदेश संबंधित जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रोष्टर अद्ययावत करण्यात आलेले नाहीत, तर खासगी 1 हजार 492 शाळा ज्या शिक्षक भरतीसाठी इच्छुक आहेत; त्यापैकी साधारण 800 शाळांनी आपले रोष्टर अद्ययावत केले आहे. त्यामुळे शिक्षक भरती ज्या रोष्टरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ती रोष्टर प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होणार हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरितच असलेला दिसून येत आहे.

चार हजार जागांबाबत संभ्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदवीधर शिक्षक आणि विनापदवीधर शिक्षक असे दोन संवर्ग आहेत. यातील पदवीधर शिक्षकांची भरती प्रक्रिया कशी करावी याबाबतची नियमावली नसल्यामुळे 4 हजार शिक्षकांच्या जागांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत तोडगा काढण्यात आला तर साधारण 15 हजार जागांवर शिक्षक भरती होण्याची शक्यता आहे.