होमपेज › Pune › पुण्याच्या राजकीय वर्तुळात ‘चाणक्य’ भेटीचीच चर्चा

पुण्याच्या राजकीय वर्तुळात ‘चाणक्य’ भेटीचीच चर्चा

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 1:12AMपुणे : दिगंबर दराडे 

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा आठ जुलैला पुणे दौर्‍यावर येत आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होणार्‍या व्याख्यानात ‘चाणक्य’ या विषयावर शहा बोलणार आहेत. या दौर्‍यात अमित शहा कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. बूथ प्रमुख व केंद्र प्रमुखांच्या बैठकीला ते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटीचा कार्यक्रमही ठरविण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रम वेगवेगळे असले, तरी शहांचा दौरा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून, विधानसभानिहाय तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. भाजपच्या विजयाचे शिल्पकार म्हणून शहांचा नावलौकिक आहे. अमित शहा निवडणूक ही विजयासाठीच लढवितात. ती लढविण्याआधीच त्यांचे नियोजन भक्‍कम असते, मग पुणे दौरा लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचाच दौरा असेल, असेच राजकीय वर्तुळात मानले जात आहे. भाजपकडून विधानसभानिहाय आढावा घेण्याचे काम सध्या सुरू आहे. विविध क्षेत्रातील तीन हजार लोकांना एकत्र आणून, पुण्यातला आगळावेगळा कार्यक्रम करण्याचे लक्ष्य  यानिमित्ताने शहर व प्रदेश कार्यकारिणीसमोर ठेवण्यात आले आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत प्रत्येकाने तयारी सुरू केली आहे. एकीकडे युतीचे संकेत दिले जात असताना दुसरीकडे भाजपने शिवसेनेचे नेते फोडण्याचा दणका लावला आहे. शिवसेनेला भाजप युती करेल की नाही याची शंका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना आणि शिवसेनेला जशास तसे उत्तर देणारा भाजप, हे सध्याचे चित्र आहे. मात्र, युती व्हावी अशी दोन्ही पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांची इच्छा आहे, परंतु तसे बोलण्याचे धाडस कोणी करीत नाही. शहा यांच्या भेटीनंतर अनेक अधांतरी प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शिवेसना-भाजपचा गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला कलगितुराही आता थांबण्याची चिन्हे असून, आगामी निवडणुकीत सर्वात जुने दोस्त पुन्हा गळ्यातगळा घालण्याची दाट शक्यता आहे. उभय पक्षांच्या नेत्यांकडून युतीचे संकेत दिले जात असले तरी, दोघांनीही अद्याप पत्ते खुले केले नाहीत. यामुळे शहांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

रणनीतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे

पुणे भेटीतील घडामोडीमागचे राजकीय नाट्य त्यांच्या दौर्‍यानंतर निश्‍चितपणे पुढे येईल. शहा यांनी गेल्या वर्षभरात देशभर भाजपची संघटनात्मक बांधणी शेवटच्या स्तरापर्यंत केली. ती केवळ व्यक्तींपुरतीच मर्यादित नव्हती, तर भाजपचे वैचारिक अधिष्ठान कसे भक्कम होईल, याचीच त्यांनी दक्षता घेतली. भाजपचा जो विचार आहे त्याचे आदान-प्रदान व्हावे यासाठी ते कटिबद्ध राहिले. या सगळ्यात पक्षाचा सामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांनी हे काम केले. पक्षाची संख्यात्मक वाढ होत असताना मूळ विचारसरणीपासून संघटना भरकटता कामा नये, याची खबरदारी त्यांनी घेतली.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex