Mon, Jul 06, 2020 04:04होमपेज › Pune › पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांचा ‘साथी’ बसपाची ‘हत्‍ती’

पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांचा ‘साथी’ बसपाची ‘हत्‍ती’

Published On: Aug 05 2018 1:32AM | Last Updated: Aug 04 2018 11:56PMपिंपरी : प्रदीप लोखंडे 

कोणतीही प्रसिद्धी नाही. जाहीर कार्यक्रमांची व आंदोलनाची रेलचेल नाही. घरोघरी जाऊन भूमिका सांगणे आणि पक्षाशी नागरिकांना जोडून घेण्याचे कार्यकर्त्यांचे काम पिंपरी-चिंचवड शहरात पक्षवाढीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने अशा प्रकारे आपली रणनीती ठरवली आहे. पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ असणारे जास्तीत-जास्त कार्यकर्ते घडविणे हा उद्देश ठेवून बसपाचे शहरात कामकाज सुरू आहे. अद्याप पर्यंत पक्षाची पिंपरी, भोसरी व चिंचवड मतदारसंघात बांधणी झाली असल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात बहुजन समाज पार्टीने आपले पाऊल टाकले आहे. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबवून सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये पक्ष वाढविण्याचा चंग पक्षाच्या वतीने बांधण्यात आला आहे. त्यानुसार कामही सुरू आहे. 2017 मधील महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारही उभे करण्यात आले होते. त्यांना अपेक्षित मतेही मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील उत्साहदेखील दुणावला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते शहरावर विशिष्ट लक्ष ठेऊन आहेत. सध्या अध्यक्ष, कोषाध्यक्ष व प्रभारी सारख्या पदांचे काही प्रभागामध्ये वाटपही करण्यात आले आहे. पदांच्या जबाबदारी देखील वाटून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दर महिन्याला पदाधिकार्‍यांना आपल्या कामाचा अहवाल पश्‍चिम महाराष्ट्राच्या प्रभारींना द्यावा लागत आहे. 

सध्या पक्षाची विधानसभानिहाय बांधणी सुरू आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये बुथनिहाय बांधणी सुरू आहे. एका बुथला दहा सक्षम कार्यकर्ते नेमण्यात येणार आहेत. या कार्यकर्त्यांना एक हजार लोकांना पक्षाची भूमिका सांगून जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर सेक्टरची बांधणीदेखील सुरू आहे. प्रत्येक सेक्टरला सेक्टर अध्यक्ष, महासचिव व कोषाध्यक्ष असे तीन पदाधिकारी आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये 12 सेक्टरमध्ये पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. भोसरीमध्ये 19 सेक्टर तर, चिंचवड मतदारसंघामध्ये 15 सेक्टरमध्ये पदाधिकारी नेमण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून खासदार डॉ. सिद्धार्थ अशोक व पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रभारी किरण आल्हाट यांनी शहरात विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी पदाधिकार्‍यांच्या कामाचा अहवाल घेतला जात आहे. त्यामुळे कार्यकर्तेही जोरात कामाला लागले आहेत. पक्षाकडून जाहिर कार्यक्रम, आंदोलने घेण्यास बंदी घातली आहे. घरोघरी जाऊन केवळ पक्षाची भुमिका सांगून कार्यकर्ते जोडण्याची कामे सुरू आहेत. येत्या महापालिकेला भरघोस यश मिळविण्याचा चंगच पक्षातील पदाधिकार्‍यांना बांधला असल्याचे पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रभारी किरण आल्हाट यांनी सांगितले.