Sat, Jun 06, 2020 12:05होमपेज › Pune › राज्य सहकारी बँकेला ३१६ कोटींचा निव्वळ नफा

राज्य सहकारी बँकेला ३१६ कोटींचा निव्वळ नफा

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:59AM
पुणे : प्रतिनिधी
राज्य सहकारी बँकेला आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 563 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झालेला आहे. तर गतवर्षी म्हणजे 2017-18 मध्ये असणारा निव्वळ नफा 201 कोटी रुपयांवरून वाढून संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 316 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) निव्वळ प्रमाण केवळ 1.15 टक्क्यांइतके राखण्यात यश आले आहे. 

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेेंडे यांनी ही माहिती दिली. राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्व आर्थिक निकषांचे पालन केले असून, गतवर्षीच्या तुलनेत बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे अनास्कर म्हणाले. राज्य शासनाने नेमणूक केल्यानंतर 12 जून 2018 रोजी नवीन प्रशासक मंडळाने बँकेचा कार्यभार स्वीकारला. बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली वाढ, शाखांमध्ये झालेली वाढ, प्रति कर्मचारी नफ्यातील लक्षणीय वाढ, प्रति कर्मचारी व्यवसायात झालेली 7 कोटींची वाढ महत्त्वपूर्ण आहे. या सर्व सक्षम आर्थिक निकषांमुळे बँक नवीन व्यवसायात पदार्पण करण्याबरोबरच काही बँकांचे विलीनीकरण करून आपला व्यवसाय वाढविण्याच्या विचारात आहे, असेही ते म्हणाले.

सन 1911 मध्ये 50 रुपयांचा एक अशा 1400 भागांचे वितरण जनतेमध्ये करण्यात आले. सुरुवातीस केवळ 70 हजार रुपयांचे भांडवल असलेल्या बँकेचा स्वनिधी आज 4 हजार कोटींच्या वर गेलेला आहे. 108 वर्षांच्या इतिहासात उच्चांकी व्यवसाय, ठेवींचा व कर्जांचा उच्चांक झाल्याचेही त्यांनी सांगितले. 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी 15 हजार 840 कोटी, कर्जे 19 हजार 700 कोटी, तर एकूण व्यवसाय 35 हजार 540 कोटी रुपयांइतका झाला असून हा गेल्या 107 वर्षांतील प्रगतीचा उच्चांक आहे. महाराष्ट्रानंतर एकूण व्यवसायात कर्नाटक 12 हजार 566 कोटी, गुजरात 11 हजार 978 कोटी तर आंध्र प्रदेश 11 हजार 557 कोटी याप्रमाणे क्रमांक लागतो. अशाप्रकारे महाराष्ट्राचा व्यवसाय हा या तीन राज्यांइतका आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही अशिया खंडातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक म्हणून ओळखली जाते.

बँकेचा स्वनिधी 5 हजार कोटींपर्यंत जाईल

बँकेचा स्वनिधी 4004 कोटी रुपयांइतका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून थकहमी पोटी मिळणार्‍या 1049 कोटींमुळे तो पाच हजार कोटी रुपयांवर जाईल. 31 मार्च 2019 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र या व्यापारी बँकेचा स्वनिधी  5 हजार 739 कोटी रुपयांइतका आहे. त्या खालोखाल राज्य सहकारी बँकेचा स्वनिधी पाच हजार कोटींपर्यंत होत असल्याने, नाबार्डच्या परवानगीने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सामील होण्याचा निर्णय राज्य बँकांनी घेतला आहे.