Fri, Sep 20, 2019 21:34होमपेज › Pune › ‘सिक्स पॅक’ची पोलिसात क्रेझ!

‘सिक्स पॅक’ची पोलिसात क्रेझ!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : अक्षय फाटक

पोलिस म्हटलं की पिळदार मिशा, वाढलेलं पोट आणि हातात लांबलचक काठी अशी काहीशी छबी डोळ्यासमोर येते. रात्र नि दिवसाचा विचार करता अविरत जनसेवा  करणारा पोलिस अधिकारी आणि कर्मचारी केवळ लठ्ठपणामुळे  चेष्ठेचा विषय ठरतो. परंतु, ही नकारात्मक प्रतिमा गेल्या काही वर्षांत पोलिसांनी जाणीवपूर्वक बदलण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीतही ते खास व्यायामासाठी वेळ काढून शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर देत आहेत. त्यातही पोलिस दलात ‘सिक्स पॅक अ‍ॅब्ज’ आणि फिटनेसची के्रझ वाढत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, महिला अधिकारी आणि कर्मचारीही  फिटनेसबाबत कमालीच्या जागरूक आहेत. सध्या चित्रपटांमध्ये तंदुरुस्त शरीरयष्टीच्या धडाकेबाज पोलिस अधिकार्‍यांच्या भूमिका सर्रास दाखवल्या जातात. प्रभावी माध्यमातील या बदलाचा परिणाम पोलिसामध्ये फिटनेसबाबत जनजागृती होण्यात झाल्याचे निरीक्षण आहे. 

धकाधकीच्या जीवनात 24 तास ऑनड्युटीमुळे पोलिसांचे शारीरिक फिटनेसकडे दुर्लक्ष होते. पोलिस ठाण्यात दैनंदिन काम करताना रात्री-अपरात्री करावी लागणारी ड्यूटी, त्यात दररोजची आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींची सुरक्षा आणि त्यात विविध उत्सवातील बंदोबस्त, यामुळे कुटुंब आणि शरीराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. अवेळी आहार, अपुरी झोप याचा परिणाम शरीरावर होऊन कमी वयात विविध व्याधी जडण्याचा पोलिसांना धोका असतो.   अर्धे आयुष्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी खर्ची घातल्यानंतर उर्वरित आयुष्य आजारांचा सामना करत काढावे लागते.  परंतु, गेल्या काही वर्षात पोलिस दलातील हे चित्र झपाट्याने बदलत आहे.

पोलिस स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक होत असल्याने ढेरपोट्या पोलिसांची जागा तंदुरुस्त पोलिसांनी घेतली आहे. त्यातही 2000 सालानंतर पोलिसांमध्ये  हा बदल प्रकर्षांने जाणवू लागला आहे.  पूर्वी पोलिस दलात येणारे कर्मचारी हे सातवी, दहावी पास असणारे असायचे. मात्र, आता उच्चशिक्षित तरुण-तरुणीही पोलिस दलात येत आहेत. सध्याची पिढी फिटनेसबाबत कमालीची जागरूक आहे. डाएट, फिटनेस हे शब्द त्यांच्या तोंडी सारखे असतात. त्याचा  या ‘कॉन्शन’चा परिणाम नव्या दमाच्या पोलिसांमध्ये तंदुरुस्तीच्या रुपात दिसत आहे. 

गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या भूमिकेवरील विविध चित्रपट आलेले आहेत. त्यात भारदस्त शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि ‘सिक्स पॅक अ‍ॅब्ज’ असा फिटनेस असणारे पोलिस अधिकारी दाखवण्यात आले आहेत.  बॉलिवूडचा स्टार सलमान खान यांच्या बॉडीचे तर लाखो प्रशंसक आहेत. अभिनेता अजय देवगनची भूमिका असलेल्या ‘सिंघम’ या  चित्रपटाने तर महाराष्ट्रातील पोलिसांमध्ये फिटनेसची क्रेझ चांगलीच वाढली. त्यातही दाक्षिणात्य चित्रपटात कायमच रुबाबदार शरीरयष्टी असलेल्या पोलिसांचे दर्शन घडते. प्रभावी माध्यम असलेल्या या चित्रपटांचा परिणाम साहजिकच पोलिसांवरही होत आहे. त्यामुळे पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांमध्ये तंदुरुस्तीबाबत जागृती झाली आहे. 

24 तास ऑन ड्यूटी असणारे अनेक कर्मचारी व अधिकारी ‘जीम’साठी दिवसातील एक तास वेळ राखून ठेवतात.  त्यातही काही वेळा त्यांना रात्री-अपरात्री घटनास्थळी थांबावे लागते. त्यानंतरही घरी न जाता प्रथम व्यायामाला प्राधान्य दिले जात आहेत. सकाळी, दुपारी आणि रात्री अशा वेळांमध्ये सध्या ते व्यायाम करत आहेत. तर, अनेक जण फिटनेससाठी डाएटही करतात. पुणे पोलिस दलातील एका अधिकार्‍याने केवळ चार महिन्यांमध्ये डाएट करून पोट कमी केले आहे. 

दिवसातून स्वत:साठी एक तास 

पुणे पोलिस दलातील 56 वर्षीय पोलिस निरीक्षक अनिल पाटील हे आजही सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग करतात. पुणे मॅरेथॉनसह शहरात होणार्‍या प्रत्येक धावण्याच्या स्पर्धेेत त्यांचा सहभाग असतो.  आठवड्यातून एकदा 55 ते 60 किलोमीटर सायकलिंग करतात. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, “वेळ मिळत नाही हे कारण पुढे न करता दिवसातून एक तास स्वत:साठी काढला पाहिजे. इच्छा असल्यास कितीही काम असेल, तर एक तास मिळतो, हे नक्की.”

 

Tags : pune, pune news, Police, health, gym, Six Pack, Craz,


  •