Mon, Jun 17, 2019 10:55होमपेज › Pune › सिंहगड संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित

सिंहगड संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित

Published On: Oct 12 2018 5:55PM | Last Updated: Oct 12 2018 5:55PMपुणे : पुढारी ऑनलाईन 

सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या, पुणे सिंहगड संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहील्याचे समोर आले आहे. या संस्थेच्या पुणे जिल्हयातील १२ संस्थामधील २ हजार २०५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ही शिष्यवृत्ती १० कोटीहुन अधिक असून ती रक्कम विद्यार्थ्यांना वाटपासाठी चेकव्दारे संस्थेकडे देण्यात आली होती. परंतु संस्थेने केवळ ४२६ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती वाटली. संस्थेने शिष्यवृत्तीच्या स्वरूपात २ कोटीच्या जवळपास रकमेचे वाटप केले आणि उर्वरित रक्कम प्राध्यापकांच्या पगारासाठी वापरली. त्यामुळे विद्यार्थी मात्र शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

सिंहगड संस्थेतील सन २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने अंतर्गत सोसायटीच्या पुणे जिल्हयातील १२ संस्थामधील २ हजार २०५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनेची रक्कम १० कोटी ६ लाख ५९ हजार ७४८ रुपये विद्यार्थ्यांना देण्यासाठी सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीकडे चेकद्वारे देण्यात आली. परंतु सोसायटीच्या अंतर्गत संबंधीत संस्थांनी सादर केलेल्या अंशतः वितरणाची उपयोगिता प्रमाणपत्रे तपासली असता, २ हजार २०५ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४२६ विद्यार्थ्यांना १ कोटी ८९ लाख ८७ हजार ९५४ एवढीच रक्कम दिली असल्याचे उघड झाले आहे. 

याप्रकरणी गुरुवारी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात उपस्थित राहून सोसायटीने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम सोसायटीच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचीत ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्रभारी संचालकांनी स्पष्ट आदेश देत सिंहगड संस्थेला उर्वरित १ हजार ७७९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ८ कोटी १३ लाख ६३ हजार ७९४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावेत आणि येत्या 25 तारखेपर्यंत शिष्यवृत्ती जमा केल्याचा अहवाल सादर करावा असे स्पष्ट आदेश दिले आहेत.