Sat, Jul 11, 2020 13:09होमपेज › Pune › विद्यापीठात ‘झोनिंग’; ‘मास्टर प्लॅन’ तयार

विद्यापीठात ‘झोनिंग’; ‘मास्टर प्लॅन’ तयार

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 12:50AM

बुकमार्क करा

पुणे : लक्ष्मण खोत 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. मास्टर प्लॅननुसार विद्यापीठात शैक्षणिक, प्रशासकीय आणि निवासी असे तीन विभागाचे झोनिंग करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली. 

विद्यापीठाच्या भविष्यकालीन वाटचालीचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी चार वर्षापूर्वी ख्रिस्तोफर बेंनिजर यांची नियुक्ती करण्यात आली होती. विद्यापीठाची शैक्षणिक ओळख टिकवून ठेवून विद्यापीठातील विविध समस्यांचा अभ्यास करून विविध उपाययोजना करणारा विद्यापीठाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात नेमण्यात आलेल्या संस्थेद्वारे विद्यापीठाला मास्टर प्लॅन सादर करण्यात आला. विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसमोर बुधवारी मास्टर प्लॅनचे सादरीकरण करण्यात येणार असून त्यांची सूचना लक्षात घेण्यात येणार आहेत. 

विद्यापीठाच्या मास्टर प्लॅननुसार विद्यापीठात वेगवेगळ्या पार्किगंची ठिकाणे विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठातील प्रत्येक विभागानुसार असलेले पार्किंगची सुविधा बंद करण्यात येणार असून प्रत्येक इमारतीपासून 200 मीटर पर्यंत पार्किंगची सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्याठिकाणांहून प्राध्यापक, विद्यार्थीसह सर्वांना सायकलचा वापर करावा लागणार आहे.

त्यामुळे विद्यापीठातील पार्किंगची समस्या सोडविण्यास मदत होणार असून विद्यापीठ परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती डॉ. शाळीग्राम यांनी दिली.विद्यापीठातील काही इमारतींचे बांधकाम खूप जुने आहे. त्यामुळे अशा इमारती आता झोनिंगनुसार  स्थलांतरित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसारख्या चांगल्या ब्रिटिशकालिन इमारतींचे संवर्धन करण्यात येणार आहे. 

विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बदलणार

विद्यापीठाचा मास्टर प्लॅन महापालिकेकडे सादर कऱण्यात आला आहे. पीएमआरडीए आणि महापालिकेच्या भविष्यातील नियोजनानुसार विद्यापीठ रोडवरुन जाणार्‍या मेट्रो मार्गामुळे विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. सध्याच्या प्रवेशद्वारावरुन फक्त विद्यार्थ्यांना चालत प्रवेश करता येणार आहे. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार कोटी गेट जवळून करण्यात येणार असून विद्यापीठात येणार्‍या वाहनांना त्या ठिकाणांहून प्रवेश दिला जाणार आहे. 

नवीन इमारती बांधकामाला बसणार आळा 

विद्यापीठात मास्टर प्लॅननुसार विद्यापीठातील एकूण जागेपैकी 50 टक्के जागा गार्डन, मोकळी जागा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे विद्यापीठातील दाट झाडांमुळे आणि निसर्गसंपदेमुळे असलेले वैभव ठिकून राहण्यास मदत होणार आहे. तसेच या जागांवर कोणतेही नवीन इमारतीचे बांधकाम करता येणार नसल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.