Fri, Sep 20, 2019 21:27होमपेज › Pune › मोहिते पाटलांना पर्याय ठरले संजयमामा

मोहिते पाटलांना पर्याय ठरले संजयमामा

Published On: Mar 23 2019 1:39AM | Last Updated: Mar 23 2019 1:39AM
बारामती : प्रतिनिधी

भाजपच्या सहकार्याने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकावलेल्या संजय शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 22) खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार यांनी माढ्यातून शिंदे, तर उस्मानाबादमधून राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी या वेळी जाहीर केली. ‘अंतर्गत राजकारणामुळे मध्यंतराच्या काळात मी बाजूला गेलो होतो. परंतु, मनाने मी सदैव तुमच्यासोबतच होतो, अशी कबुली शिंदे यांनी दिली’, तर ‘घरातला माणूस परत आला तर त्याला पक्षप्रवेश कसे म्हणायचे’, असा सवाल करीत पवार यांनी ‘माढ्यातून शिंदे हे माझ्यापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील’, असा विश्वास व्यक्‍त केला.

माढा लोकसभा मतदारसंघातील घडामोडींसाठी बारामती हे शुक्रवारी (दि. 22) महत्त्वाचे केंद्र ठरले. शुक्रवारी सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडल्या. दुपारी चार वाजता शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहातील कार्यक्रमात शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्याच ठिकाणी त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आली. 

राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर संजय शिंदे यांनी शरद पवार व आ. अजित पवार यांचे ऋण व्यक्‍त केले. मी राष्ट्रवादीपासून कधीच लांब नव्हतो. अन्य पक्षातही गेलो नाही. सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी तेथे चुकीचे काम चालविले होते. त्यामुळे यासंबंधी मी मागे खा. पवार यांना पत्र देत माहिती दिली होती. त्यांच्या वागण्यामुळे राष्ट्रवादीपासून सामान्य माणूस तुटला होता, अशी टीका त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव न घेता केली. मी कोणत्या अडचणीमुळे राष्ट्रवादीत आलेलो नाही, तर पवारांवरील प्रेमापोटी आलो आहे,’ असे शिंदे म्हणाले.

माढा लोकसभा मतदारसंघ देशपातळीवर चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याविषयी गेले महिनाभर माध्यमांत चर्चा रंगली. महाराष्ट्रात गाजणारा प्रवेश असे शिंदे यांच्या प्रवेशाचे वर्णन करत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा पूर्ण ताकदीनिशी मागे उभा राहणार असल्याचे सांगितले. 2014च्या वादळात सातारा जिल्हा हलला नाही. परंतु, लोकसभेचे उमेदवार म्हणून तुम्हीही आता समतोल साधा, असा सल्ला त्यांनी शिंदे यांना दिला. तुमचे बंधू बबनराव व मी अपक्ष म्हणून बरेच काही सोसले. आता चांगले दिवस यावेत, ही अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे फुटीरच पाडू शकतात, अन्यथा येथील जनता शरद पवार यांचा विचार डावलेल, हे शक्य नाही, असेही ते म्हणाले.