Tue, Oct 22, 2019 14:31होमपेज › Pune › रक्षाबंधनसाठी एसटीची विशेष वाहतूक

रक्षाबंधनसाठी एसटीची विशेष वाहतूक

Published On: Aug 14 2019 3:00PM | Last Updated: Aug 14 2019 3:00PM
पुणे: प्रतिनिधी

यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यत येईल.

भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून ‘रक्षाबंधन’ सणाला अनन्य साधारण महत्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहिण भावाकडे ओवाळण्यास जाते. साहजिकच या दिवशी प्रवासी वाहतूकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 

सुरक्षित प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवासी मित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मार्गस्थ निवाऱ्यावर जादा वाहतुकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे.