Mon, Sep 16, 2019 06:02होमपेज › Pune › पावसाचा फटका मुख्य रस्त्यांना!

पावसाचा फटका मुख्य रस्त्यांना!

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 10:20PMपुणे : सुहास जगताप

मोठी ओढ दिल्यानंतर अखेर पावसाला सुरुवात झाली असून त्याचा पहिला फटका रस्त्यांना बसला आहे. राष्ट्रीय, राज्य महामार्गासह केवळ खेड्यातीलच नव्हे तर नगरपरिषद व मोठ्या शहरांमध्ये अंतर्गत रस्ते पूर्णपणे खड्यात गेले आहेत. पुणे-नाशिक, पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गांची तर अत्यंत दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी रोजचीच झाली आहे. तसेच वाहतुकीसाठी दोन्ही रस्ते अतिशय धोकादायक झाल्याने या रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुर्दैवाने एवढे सर्व होऊनही टोल कंपन्या जोरात वसुली करत आहेत. तो भुर्दंड वेगळाच द्यावा लागत आहे.

पुणे-सातारा महामार्गावर रिलायन्स इन्फ्रा या कंपनीने गेल्या दहा वर्षांपासून मनमानी लावली असून त्यांना रोखणारे कोणी आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावर चारपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच सहापदरीकरण सुरू करण्यात आले आणि काम पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येणारा टोल काम सुरू होताक्षणी सुरू करण्यात आला. तेव्हापासून सुमारे दहा वर्षांपासून रस्त्याचे काम आणि टोल दोन्हीही सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी त्यांच्या दावणीला बांधल्यासारखी स्थिती आहे. राजकीय नेत्यांचे वर्तनही यापेक्षा वेगळे असल्याचे दिसत नाही. बैठकांमध्ये कंपनीच्या अधिकार्‍यांना दमबाजी, आरडाओरडा करणे, लुटुपुटूची आंदोलन करणे यापलीकडे रस्त्याचे काम सरकायला तयार नाही. नाशिक महामार्गवर टोलनाका बंद पाडण्यात आला आहे. तरीही महामार्गाचे काम पुढे सरकायला तयार नाही. सातारा आणि नाशिक महामार्गचे काम ज्या मुख्य कंपन्यानी घेतले आहेत, त्या कंपन्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याचे काम ज्यांना दिले आहे त्याच्यात वाद असल्याचे दिसते आहे. त्यामुळे कामाला दिरंगाई होत आहे. परंतु त्यासाठी भूसंपादन वगैरे कारणे पुढे केली जात आहेत आणि सरकार मुख्य कंपनीवर कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे रस्त्याची दूरवस्था होऊन अपघातात अनेकांचे प्राण गेले, कित्येकजण जखमी झाले आहेत.

टोलरोडवर खड्डे कसे पडतात आणि तरीही टोल कसा वसूल केला जातो हा प्रश्‍नच आहे. या दोन्ही रस्त्यांवर खड्यांचे अपघाती सापळे तयार झाले आहेत. तरीही रस्ते दुरुस्त होत नाहीत आणि टोलवसुलीही बंद होत नाही, अशी स्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील अंतर्गत रस्तेही अत्यंत खराब झाले आहेत. या मुळे रस्त्यांच्या दूरवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग अपघात मार्ग

उर्से, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी आणि मराठवाडा, विदर्भ व मावळ, मुंबईकडे जाण्यासाठीचा तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांची संख्या मागील काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. तळेगाव, चाकण या औद्योगिक वसाहतीत याच मार्गाने अनेक अवजड वाहने येत असतात, मात्र सध्या हा महत्त्वाचा महामार्ग ‘अपघात मार्ग’ म्हणून चर्चेत येत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे साईडपट्ट्या दिसेनाशा झाल्या आहेत, त्यामुळे वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न वाहनचालकांना पडला असून, रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. रस्त्याच्या लगतचे पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्था करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे; परंतु प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.  

मागील चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने चाकण परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाऊस मुसळधार नव्हता, तरीदेखील अशी अवस्था झाली आहे. जर धो-धो पाऊस सुरू झाला, तर काय अवस्था होईल, याची कल्पनादेखील नागरिकांना अस्वस्थ करणारी आहे. येथील रस्त्यांच्या कडेला असलेल्या मातीमुळे रस्त्यावर चिखल होत आहे. त्यामुळे रस्त्याची साईडपट्टीच दिसेनाशी झाली आहे. रस्त्यालगत साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन जोरात आपटून अपघाताचा धोका आहे.

चांडोली टोलनाका ते खेड घाटमाथा खड्ड्यात

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गवर चांडोली टोलनाका ते खेड घाट माथा दरम्यान जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडण्याबरोबरच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तरीही रस्ते प्राधिकरण याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशी व वाहन चालकांचा जीव गुदमरला आहे. नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळील आठ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस, वॉर्डन काम करत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळणांचे काम लवकर होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदलाही मिळाला, परंतु त्याचे काम तीन वर्षांपासून बंद असून प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

पावसाबाबत कही खुशी, कही गम!

अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाने जिल्ह्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली. असे असले तरी अवर्षणग्रस्त असलेल्या इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्याला मात्र पावसाने हुलकावणीच दिली. कमी-जास्त प्रमाणात या तालुक्यांमध्ये पाऊस झाला असला तरी तो शेती पिकांसाठी उपयुक्त नसल्याने शेतकरी हवालदील झालेला दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे इंदापूर, बारामती व पुरंदरच्या जिरायती पट्ट्यात तर खरिपाची पेरणी झालेली नाही. दुसरीकडे जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर तसेच भोर, मुळशी, वेल्हा आदी भागांत उत्तम पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी आनंदी आहेत. एकंदरीत यामुळे पावसाबाबत ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती आहे.