Thu, Jul 16, 2020 09:17होमपेज › Pune › लाचखोरीत राज्यात पुणे विभाग नंबर एकच

लाचखोरीत राज्यात पुणे विभाग नंबर एकच

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
पुणे : प्रतिनिधी

सरकारी कामासाठी लाच स्विकारण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. मागील काही वर्षात नागरिकांमध्ये झालेल्या जनजागृतीमुळे भ—ष्टाचाराची प्रकरणे सामान्य नागरिक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मदतीने उघडकीस येत आहेत. एसीबीने केलेल्या कारवाईवरून राज्यातील सरकारी कार्यालयातील भ—ष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला असल्याचे उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमुळे स्पष्ट होत आहे. मागील काही वर्षात लाचखोरीत अव्वल स्थानी असलेल्या पुणे विभागाने याही वर्षी लाचखोरीत आपले अव्वल स्थान कायम राखले असून, लाचखोरीत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील उपलब्ध असलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे विभागात 5 नोव्हेंबर अखेर लाचखोरीचे 152 गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये तब्बल 208 संशयीत आरोपींवर अटकेची कारवाई झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त 52 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर सातारा,  सांगली, सोलापूर कोल्हापूरमध्ये अनुक्रमे 22, 18, 32, 25 अशा प्रकारे गुन्हे उघडकीस आले आहेत. जिल्ह्याचा विचार करता पुण्यापाठोपाठ, ठाणे 42, औरंगाबाद 38, सोलापूर  32, नागपूर 29 तर अमरावती जिल्ह्यातील 28 गुन्हे यांचा क्रमांक लागतो. 

विभागाचा विचार करता ठाणे विभागात या वर्षात 78 गुन्हे, नाशिक विभागात 101, नागपूर विभागात 88 गुन्हे, अमरावती विभागात 97 गुन्हे, औरंगाबाद विभागात 109 आणि नांदेड विभागात 71 गुन्हे उघडकीस आले आहेत.  गत वर्षीच्या तुलनेत सापळ्यांमध्ये घट झाली असली तरी, इतर विभागांच्या तुलनेत लाचखोरीत पुणे विभाग अव्वल स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गत वर्षी पुणे विभागात लाचखोरीचे 204 गुन्हे उघडकीस आले होते. तर  अनुक्रमे 2017 आणि 2016 मध्ये 190 आणि 187 गुन्हे उघडकीस आणण्यास एसीबीला यश आले होते.   

चालू वर्षात राज्यात लाचखोरीची 725 प्रकरणे उघड झाली. त्यामध्ये तब्बल 980 जणांना अटक झाली. त्यामध्ये पोलिसांविरोधात राज्यात 162 गुन्हे दाखल होऊन, 226 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये वर्ग1 आणि वर्ग 2 प्रत्येकी दहा अधिकारी एसीबीच्या सापळ्यात आडकले. वर्ग तीनच्या तब्बल 173 कर्मचार्‍यांवर लाच स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ महसूल विभागातील तब्बल 164 प्रकरणे उघडकीस आली त्यामध्ये 223 जणांना अटक झाली.