Sun, Nov 17, 2019 12:41होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत लाखोंचा घोटाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत लाखोंचा घोटाळा

Published On: Jul 12 2019 4:24PM | Last Updated: Jul 12 2019 4:05PM
पुणे : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील, कमवा आणि शिका योजनेतील समन्वयकांनी साडे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या योजनेत विध्यार्थ्यांची खोटी नावे दिली. जे विद्यार्थी कामच करत नाहीत, अशांच्याही नावावर पैसे उचलण्यात आले आहेत. तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समजते. याप्रकरणी शिक्षकांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी विद्यापीठात विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) आहेत. तर, यातील आरोपी तिघे कमवा आणि शिका योजनेचे समन्वयक आहेत. तिघांनी या योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे देऊन त्यांची नोंदणी केली. त्यांचे नावावर येणारे पैसे स्वत:च्या बँक खात्यावरून घेतले. जे विद्यार्थी या योजनेत काम करत नाहीत, अशांच्याही नोंदी करून त्यांचे पैसे त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर पाठविले. 

यानंतर त्यांचेकडून हे पैसे रोख स्वरूपात घेतले. हा सर्व प्रकार नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला. याबाबत चतुश्रृंगी पोलिसांकडे तक्रार अर्ज आला होता. त्या अर्जाची चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.