Tue, Sep 17, 2019 03:48होमपेज › Pune › ‘गडकरी’ साहेब ‘रोडकरी’ कंपन्यांनी पुणेकरांना झुलवले

‘गडकरी’ साहेब ‘रोडकरी’ कंपन्यांनी पुणेकरांना झुलवले

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 12:51AMपुणे : दिगंबर दराडे

पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-नगर याचबरोबर रखडलेले पालखी मार्गाची कामे यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ते बांधणी करणार्‍या कंपन्यांना अनेक वेळा कारणे दाखवा नोटीस पाठवूनही त्यांची मनमानी कमी होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, या मार्गांच्या रखडलेल्या कामांमुळे अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. देहू रोड ते कात्रजदरम्यान वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 12 वषार्र्ंपासून सुरूच आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच टोलवसुलीचा दणका दिला आहे. पुणे सातारा महामार्गाच्या देहू रोड ते सातारा या 140 कि.मी.च्या चौपदरीकरणासाठी 1999 मध्ये 60 मीटरचे भूसंपादन केले. 2004 मध्ये चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. हे काम पूर्ण झाल्यावर 2010 मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डिझाईन बिल्ट फायनान्स ऑपरेट अँड ट्रान्स्फर या तत्त्वावर केंद्राने रिलायन्स इन्फा कंपनीला या कामाचा 1724 कोटी रुपयांचा ठेका दिला. त्याबदल्यात शिवापूर व आणेवाडी येथील टोलवर 2034 पर्यंत टोलवसुलीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु तब्बल बारा वषार्र्ंपासून हे काम सुरू आहे. अद्यपही ते अपूर्णावस्थेत असल्याने  या रस्त्यावरून गाडी चालविणे फार अवघड आहे. मूळ ठेकेदारांच्याकडून कामाची रक्‍कम न मिळाल्याने सब ठेकेदारांनी पळ काढल्याच्या घटनादेखील उघडकीस आल्या आहेत. या कंपनीला अनेक वेळा नोटिसादेखील धाडण्यात आल्या आहेत. तरी देखील अद्याप कामे रडखडत सुरू आहेत. विशेष म्हणजे काम रखडल्याचं खापर रिलायन्सनं नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीवर फोडलं आहे. 

पुणे-नाशिकला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चंडोली (राजगुरुनगर ते सिन्नर) या रस्त्याचे काम सुरू आहे.2012 पासून हे काम सुरू असून, 135  किमीसाठी 1968 कोटींची तरतूद केली आहे. हे काम आय  एल अ‍ॅन्ड एफ एस कंपनीला देण्यात आले आहे. मागील चार वषार्र्ंपासून हे काम सुरू आहे. मागील वषार्र्ंत केवळ पाच टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उरले आहे ते 15 ते 20 टक्केच काम. हे काम रखडल्याप्रकरणी रिलायन्स इन्फ्रावर मात्र काहीच कारवाई झालेली नाही. केवळ रिलायन्स इन्फ्राला या कामातून टर्मिनेट करावे, असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गा रस्ते प्राधिकरणने दिला होता, पण त्याचे पुढे काही झालं नाही. रिलायन्स इन्फ्राला टोलमधून मिळणारा हिस्साही तात्पुरता बंद केला होता. दंडात्मक कारवाई झाली नाही. परिणामी मागील आठ वर्षे वाहन चालक त्रास सहन करत आहेत. 

आजच्या बैठकीला तयारीनिशी उपस्थित राहा

पुणे व परिसरातील रखडलेल्या विकासकामांच्या सोडवणुकीसाठी; तसेच सरकारी बाबूंच्या लालफितीत अडकलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात विधानभवनात दुपारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच प्रमुख लोकप्रतिनिधींनाही आपल्या समस्या मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागाच्या अधिकार्‍यांनी पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना गडकरी यांच्या कार्यालयाकडून दिल्या आहेत.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex