Mon, Jun 17, 2019 10:05होमपेज › Pune › वैद्यकीय प्रवेशासाठी मनविसेची जनहित याचिका

वैद्यकीय प्रवेशासाठी मनविसेची जनहित याचिका

Published On: Oct 12 2018 5:55PM | Last Updated: Oct 12 2018 5:55PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील खाजगी महाविद्यालय तसेच अभिमत विद्यापीठानी एमबीबीएस, बीडीएस, आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांची राखीव एन.आर.आय. कोट्यातील प्रवेशप्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व खाजगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाविरोधात महाराष्‍ट्रात नवनिर्माण विद्‍यार्थी सेनेचे  शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

राज्यातील खाजगी महाविद्यालय अभिमत विद्यापीठ २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये राखीव एन.आर.आय कोट्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच या राखीव जागेतील प्रवेश करावेत, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण संचालकाकडे मनविसेने केली होती. 

या मागणीनुसार संचालकांनी सर्व खासगी महाविदयालये, अभिमत विद्यापीठांना स्पष्ट आदेश देऊन या राखीव एन.आर.आय. जागेतील प्रवेशप्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विद्यार्थी -पालक एन.आर.आय असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे अथवा विद्यार्थ्यांचे नातेवाईक एन.आर.आय. असतील आणि हे नातेवाईक या विद्यार्थ्यांची संपूर्ण फीही त्यांच्या एन.आर.आय. बँक खात्यातून देणार असतील तरच अशा विद्यार्थ्यांना या राखीव जागेतील जागेवर प्रवेश द्यावे.  

तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश देताना गुणवत्तेनुसारच प्रवेशप्रक्रिया राबवावी असे स्पष्ट आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील राखीव जागेतील प्रवेशात विद्यार्थ्यांची संपूर्ण तपशिलांसह माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करावे, असे कळविले होते .मात्र, तरीही राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत भरमसाठ डोनेशन घेऊन इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. हे प्रवेश प्रक्रिया पार पाडत असताना म्हणजेच समुपदेशन करतेवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष असे गैरप्रकार होत असल्याचे सांगत यादव यांनी वैद्यकिय महाविद्यालय आणि राज्य शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करुन दाद मागितली आहे.