होमपेज › Pune › पंतप्रधान मोदी सत्तेचा ‘मास्टर स्ट्रोक’ मारतील : रामदास आठवले 

'पंतप्रधान मोदी सत्तेचा ‘मास्टर स्ट्रोक’ मारतील'

Published On: Jan 14 2019 1:44AM | Last Updated: Jan 14 2019 1:30AM
पिंपरी : प्रतिनिधी 

विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सत्ता मिळविण्यासाठी खेळ सुरू केला आहे;  मात्र त्यामध्ये मेळ दिसत नाही. सत्तेचा मेळ कसा बसवायचा हे आम्हाला माहीत आहे. सवर्णांना 10 टक्के आरक्षण देऊन पंतप्रधान मोदींनी सिक्सर मारला आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच मास्टर स्ट्रोक मारतील, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

चिंचवड येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अधिवेशन आयोजित करण्यात आले. त्यानिमित्त पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, गंगाधर आंबेडकर, बाळा भागवत, सुधाकर वारभुवन, चंद्रकांता सोनकांबळे, रमेश चिमुरकर, लक्ष्णम गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, अजिज शेख आदींसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मंत्री आठवले म्हणाले की, पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजप हरली;  मात्र विरोधी पक्षांना मोठी टक्कर दिली. एनडीएचे देशभर वातावरण आहे. देशभरातील दलित, मुस्लिम एनडीएसोबत आहेत. सध्या वंचित बहुजन आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा फायदा भाजपलाच होईल. सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याची आमची मागणी होती. भाजप व शिवसेनेची 30 वर्षांपासून युती आहे. ती या वेळीही होईल. विरोधकांना आम्ही सत्तेतून बाहेर ठेवू. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग लोकनेते नसतानाही त्यांना पंतप्रधान केले. त्या वेळी शरद पवार पंतप्रधान व्हावे, अशी आमची इच्छा होती. ते झाले नाहीत. पुढेही होणार नाहीत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात चंद्रकांता सोनकांबळे या आमच्या उमेदवार आहेत. पक्षांतर्गत वाद कार्यकर्त्यांनी थांबवावेत, असे आवाहन केंद्रीय मंत्री आठवले यांनी केले. राम मंदिर व्हावे ही जनमानसांची भावना आहे. त्यामुळे राम मंदिर व्हावे, अशी आमचीही भावना आहे; मात्र न्यायालयाचा आदेश जो होईल, तो मान्य करायला हवा. मुस्लिम व हिंदू समाजातील लोकांनी सामोपचाराने वाद मिटविणे गरजेचे आहे. 

युती न झाल्यास आरपीआयला चार जागा

भाजप व शिवसेना यांची युती होणार आहे. झाल्यास आम्ही एक जागा मागू, मात्र युती न झाल्यास आम्ही लोकसभेला चार जागा मागणार आहोत. दक्षिण मुंबई, रामटेक, सोलापूर या जागेवर आम्ही दावा केला आहे. सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले आरपीआयच्या तिकिटावर लढणार असल्यास त्या जागेवरही आम्ही दावा करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.