Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Pune › भाजपमधील वाद ठरले पेल्यातील वादळ

भाजपमधील वाद ठरले पेल्यातील वादळ

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:18AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी स्पर्धेतील नावांना कात्री लावत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या समर्थक ममता गायकवाड यांना संधी दिली. त्यामुळे भाजपत महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सदस्य राहुल जाधव, शीतल शिंदे यांचे राजीनामा नाट्य रंगले; मात्र भाजपतील हे वाद पेल्यातील वादळ ठरले आहे. लोकसभेसाठी दावेदार असलेले आमदार महेश लांडगे बंडाचे नेतृत्व कसे  करतील? ‘व्हिप’चे काय, याचा थोडाही विचार न करता राष्ट्रवादीने भाजपतील नाराजांच्या भरवशावर मोरेश्वर भोंडवे यांना रिंगणात उतरविले; मात्र त्यांची खेळी फसली. स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. भोंडवे यांचा अर्ज भरताना समवेत असलेली शिवसेनाही तटस्थ राहिल्याने विरोधकांचे चांगलेच हसे झाले.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी (दि. 3) अर्ज दाखल करण्याची मुदत होती. नगरसेवक विलास मडिगेरी, शीतल शिंदे व राहुल जाधव यांपैकी एकाला संधी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. पक्षातील जुने निष्ठावंत विलास मडिगेरी यांच्यासाठी एकवटले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्या, तर भाजप शहराध्यक्ष चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शीतल शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला असल्याची चर्चा होती; मात्र राजकारणात धूर्त असलेल्या जगताप यांनी खेळी केली. आपल्या समर्थक ममता गायकवाड यांचे नाव ऐनवेळी पुढे आणले. त्यांच्या या धक्कातंत्राची भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.

महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्याकडे, तर स्थायी समिती  सदस्य राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले. या राजीनामा नाट्यामुळे  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली खरी; मात्र महापौरांचा राजीनामा ही आमदार जगताप यांनी महेश लांडगे यांना हाताशी धरून केलेली खेळी होती, हे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाने सिद्ध झाले आहे. त्याबदल्यात आता आ. लांडगे समर्थक नगरसेवक राहुल जाधव अथवा संतोष लोंढे यांपैकी एकाला महापौरपदी संधी मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदापासून डावलले गेलेल्या विलास मडिगेरी यांना पक्षनेतेपदी संधी दिली जाण्याची शक्यता आहे 

भाजपमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून रणकंदन माजल्याचे दिसताच, राष्ट्रवादीने मोरेश्वर भोंडवे यांचा स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एक, असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संधी न दिल्याने राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. शिवाय लक्ष्मीपुत्र  असलेले मोरेश्वर भोंडवे घोडेबाजारात भाजपमधील नाराजांची मते फोडू शकतात, असा आशावाद राष्ट्रवादीला होता; मात्र तो फोल ठरला. ममता गायकवाड यांना 11, तर राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे यांना 4 मते मिळाली. भोंडवे यांचा अर्ज भरताना समवेत असलेली शिवसेना या निवडणुकीत तटस्थ राहिली 

स्थायी समिती अध्यक्षपद निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हावी व मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करता यावे यासाठी ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याची मागणी मोरेश्‍वर भोंडवे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती; मात्र मुंबई प्रांतिक महापालिका, स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती व इतर समित्यांच्या सभापतींची निवडणूक घेणे नियम 2007 प्रमाणे ही निवडणूक घेण्यात आली. या नियमात हात वर करून मतदान घेण्याची तरतूद आहे; तसेच कलम 6 (3)नुसार पीठासीन अधिकारी निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराचे नाव वर्णानुक्रमे घोषित करेल व हात वर करून दर्शविलेल्या मतांची नोंद घेईल, अशी तरतूद आहे. 

दुसरीकडे स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 मधील कलम 3 (1 अ)नुसार पक्षाने काढलेल्या ‘व्हिप’ विरोधात मतदान केल्यास सदस्यत्व  रद्द होण्याची तरतूद आहे. सत्ताधारी भाजपने ‘व्हिप’ काढल्याने भाजपच्या नाराज सदस्यांची कोंडी झाली. परिणामी, ममता गायकवाड यांचा विजय अधिक सोपा झाला.


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex