Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Pune › लांडे-सावळे युतीची महापालिकेत जोरदार चर्चा

लांडे-सावळे युतीची महापालिकेत जोरदार चर्चा

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 1:10AMपिंपरी : संजय शिंदे 

महापालिकेच्या शुक्रवारी  (दि. 22) झालेल्या सर्वसाधारण सभेत इंद्रायणीनगर प्रभागातील वर्गीकरण आणि ‘क्लब हाऊस’ हस्तांतराच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत विलास लांडे आणि स्थायीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका सीमा सावळे यांच्यात युती झाल्याचे पाहावयास मिळाले. इतर वेळी एकमेकांना विरोधी भूमिका घेणारे प्रभागातील विकासकामाच्या बाबतीत एकत्र आल्याने याची इंद्रायणीनगर-भोसरी परिसरासह महापालिकेत जोरदार चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या तिकिटावर सीमा सावळे तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर विक्रांत विलास लांडे हे निवडून आले आहेत. विशेष म्हणजे लांडे यांनी भाजपचे उमेदवार सावळे यांचे राजकीय सल्लागार सारंग कामतेकर यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 8 मध्ये तीन उमेदवार भाजपचे आणि एकमेव उमेदवार राष्ट्रवादी काँग्रसचे लांडे हे निवडून आले आहेत. लांडे यांनी भाजपच्या कामतेकर यांचा पराभव केल्यामुळे सावळे व कामतेकरांना हा पराभव वर्मी लागल्याचे दिसून येते. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे याची राजकीय कोंडी करण्याच्यादृष्टीने  ते एकही संधी सोडत नाही.

परंतु; सध्या पालिकेमध्ये मात्र सावळे आणि लांडे हे इंद्रायणीनगरातील विकासकामाच्या अनुषंगाने एक झाल्याचे पहावयास मिळत आहेत. याच प्रभागातील भाजपचे नगरसेवक स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी वर्गीकरणाद्वारे सुचविलेल्या कामाला स्वपक्षीय सावळे व राष्ट्रवादीचे लांडे यांनी प्रखर विरोध दर्शिविला. आमचा विकासकामांना विरोध नाही परंत;ु सुस्थितील रस्त्यावर खर्च नको तो  इतरत्र वळवा असा सल्ला लांडे यांनी आयुक्तांना दिला. तसेच सर्व्हे क्रमांक 69, 77, 58 आणि 59 मधील स्पोर्टस क्लब पोलिस आयुक्तालयाला देण्यास सावळे यांनी विरोध दर्शिविला. त्याला लांडे यांनी अनुमोदन दिले. 

भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. माजी आ. विलास लांडे हे राष्ट्रवादीकडून रणांगणात उतरणार आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी जळवाजुळव सुरू केली आहे. त्याचबरोबर चिंचवड पाठोपाठ भोसरी आणि पिंपरीमध्ये कमळ फुलविण्याच्या दृष्टीने पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठी सर्वच पक्षातील नाराजांच्यावर विरोधकांनी लक्ष ठेवणे सुरू केले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे पहावयास मिळत असतानाच पालिकेबाहेर एकमेकाच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणारे मात्र पालिकेमध्ये प्रभागाच्या विकासावरुन एकत्र झाल्याचे पहावयास मिळत असल्याने याची जोरदार चर्चा भाजप, राष्ट्रवादी काँगे्रससह भोसरी विधानसभा मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे.