Tue, Sep 17, 2019 03:58होमपेज › Pune › पॅराऑलिम्पियनची लायसन्ससाठी ‘झुंज’

पॅराऑलिम्पियनची लायसन्ससाठी ‘झुंज’

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 22 2018 11:40PMपुणे : नवनाथ शिंदे

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरणाच्या विविध  स्पर्धेत देशाचे नेतृत्व करीत 105 पदकांची लयलूट करणार्‍या एका पॅराऑलिम्पियनला चारचाकी वाहन परवाना (लायसन्स) मिळविण्यासाठी आरटीओचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अपंग असूनही गाडी चालविण्यास  सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय आरटीओकडून परवना दिला जात नाही. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे लायसन्सचे दरवाजे बंद झाले आहेत. 

या प्रमाणपत्रासाठी खेळाडूला जलतरणाची प्रॅक्टिस सोडून, हा दाखला मिळविण्यासाठी ससून रुग्णालयात पाच तासांपेक्षाही अधिक वेळ वाया घालवावा लागला. तरीही विविध कारणे देत ससून प्रशासनाने प्रमाणपत्र देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हताश झालेल्या या आंतराष्ट्रीय जलतरणपटू सुयश नारायण जाधव यांनी दै. ‘पुढारी’कडे व्यथा मांडली आहे. आपल्याला उत्तमपणे चारचाकी वाहन चालविता येते. तशी परीक्षा देण्यासही आपण तयार असल्याचे त्याने म्हटले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पदकांना गवसणी घालणार्‍या आणि देशाची मान उंचाविणार्‍या सुयश यांनी 2016 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये देशाचे नेतृत्व केले आहेे. जागतिक स्पर्धेत मेक्सिको, आयवान गेम्स रशिया, जर्मनी स्विमिंग चॅम्पियनशिप बर्लिन, विंटर ओपन पोलिश चॅम्पियनशिप पोलंड, अशा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत पदकांची लयलुट केली आहे. जर्मनीत तीन रौप्यपदक, रशियामध्ये एक रौप्य आणि एक कांस्य, पोलंडमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांसह 11 आंतरराष्ट्रीय पदकांना त्याने गवसणी घातली आहे.

सुयश यांच्या या दिमाखदार कामगिरीमुळे राज्य सरकारने त्यांना एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे. सुयश सध्या इटली आणि इंडोनेशियामध्ये होणार्‍या स्पर्धेसाठी बालेवाडी जलतरण तलावात प्रॅक्टिस करीत आहे. मात्र, प्रॅक्टिस सोडून चारचाकी वाहनाच्या लायसन्ससाठी त्यांना आरटीओ व ससून सर्वोपचार रुग्णालयात खेटा माराव्या लागत आहेत.

मोटार वाहन कायद्यानुसार अपंग व्यक्ती फीट असल्याशिवाय त्यास वाहन परवाना दिला जात नाही. मात्र, राष्ट्रीय खेळाडूचा विचार केल्यास, ससून रुग्णालयाने संबंधित खेळाडूला वाहन चालविण्यास फीट असल्याचा दाखला दिल्यास, लायसन्स देता येईल अशी माहिती आरटीओतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

 

Tags : pune, pune news, Paralympian Suyash Jadhav, four wheeler license,


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex