Tue, Nov 12, 2019 15:03होमपेज › Pune › अन्य बँकेत विलीनीकरणाचा पीएमसी बँकेबाबत विचार

अन्य बँकेत विलीनीकरणाचा पीएमसी बँकेबाबत विचार

Last Updated: Oct 20 2019 2:03AM
मुंबई :

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातले असले, तरी या बँकेचे अन्य एखाद्या बँकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे पीएमसीच्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. पीएमसीच्या खातेदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएमीसी बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पॅकेज देणे, हे राज्य सरकारच्या अधीन नाही, रिझर्व्ह बँकेला तो अधिकार आहे. परंतु, पीएमसी बँकेचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. मी स्वत: पीएमसी बँकेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली आहे. निवडणुका झाल्यानंतर या संदर्भात अर्थमंत्र्यांकडे मी पुन्हा पाठपुरावा करणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या घोटाळ्यातील आरोपींना अटक केली असून त्यांची संपत्ती जप्त केली आहे. या संपत्तीचा लिलाव करून खातेदारांचे पैसे परत करायचे की नाही हे ठेवीदार कायद्यातील तरतुदी पाहून राज्य किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल, असे फडणवीस यांनी सांगितले व या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

पीएमसीमधील एक लाखापर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचेही स्पष्ट केले. या बँकेतील एक लाखापेक्षा कमी ठेवींची संख्या अधिक आहे. हाउसिंग सोसायटी, धार्मिक संस्था आणि व्यक्तिगत ठेवींची बँकेतील रक्कम मोठी असून त्याबाबत काही अडचणी आहेत. त्यामुळे निवडणुका होताच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.