Mon, Sep 16, 2019 06:03होमपेज › Pune › अनाथांची नाथ अमृता

अनाथांची नाथ अमृता

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

समाजामध्ये विविध कारणांनी अनाथ झालेल्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असलेल्या अमृता प्रणय करवंदे या 23 वर्षीय अनाथ आणि उच्चशिक्षित तरूणीला यश आले आहे. अनाथांना आरक्षण देण्यासंबंधी मसुदा तयार करण्याचे काम शासनस्तरावर सूरू आहे. समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक स्तरावर आरक्षण दिले गेले आहे. मात्र, ज्यांना आवश्यक आहे, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी सातत्याने केली जाते. परंतु, राजकीय स्तरावर प्रत्येक वेळी आश्‍वासनापलीकडे हाती काहीच लागत नाही. अनाथांना आरक्षण मिळावे यासाठी राज्यसेवा आयोग, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला बाल कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागानेही अमृताला मदत करण्यास असमर्थता दर्शवली होती. तरी निराश न होता तिने थेट मुख्यमंत्र्यांनाच भेटून त्यांना अनाथांच्या समस्यांची दाहकता समजावून देत 1 टक्का आरक्षण देण्यास भाग पाडले आहे. यामुळे राज्यातील सुमारे 80 हजार अनाथांना शिक्षण, शासकीय नोकर्‍यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. हे सर्व होण्यासाठी अमृताचा प्रवास हा निश्‍चितच सोपा नव्हता. त्यासाठी तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, त्यावर कशी मात केली याबाबत तिच्याशी केलेली बातचीत.

आरक्षणाचे धोरण जाहिर झाल्यामुळे काय वाटते?

तीन महिन्यांपासून ज्यासाठी पाठपुरावा करत होते, त्याचे फळ मिळाले. हे धोरण मंजूर झाल्याचे मंत्रालयातून व माध्यमांतून समजल्यानंतर फार आनंद झाला. 

अनाथांच्या आरक्षणासाठी लढ्याची गरज का भासली?

अनाथांचे प्रश्‍न काय असतात ते अनाथांशिवाय कोणालाही समजु शकत नाहीत. समाजातील इतर गट हे जात, धर्मांच्या अस्मितेमुळे एकत्र येउन हक्कासाठी भांडतात. पण, अनाथांना त्यांचे दैनंदिन जीवन जगण्याची भ्रांत आहे. तसेच जागृती नसल्याने व आवशक ती कागदपत्रेही मिळत नसल्याने ते एकत्र येऊ शकत नाहीत. राज्यात अनाथांची संख्या सुमारे 80 हजार असून, त्यांना शिक्षण, नोकरी मिळण्यास प्रचंड अडचणी येतात. त्यांच्यासाठी ठोस धोरण यावे, म्हणून हा लढा दिला. 

या लठढ्यात कोणत्या अडचणी आल्या, त्यासाठी काय प्रयत्न केले?

मी विक्रीकर निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक/ सहायक यासाठी राज्यसेवा परिक्षा दिली होती. त्यामध्ये खुल्या गटातील महिलांसाठी राखीव जागांचा 35 तर खुल्या गटाचा कटऑफ 46 होता. मला 39 मार्क मिळाले मी राखीव जागांसाठी पात्र ठरले होते. मात्र, त्यासाठी नॉन क्रिमीलेअर (सहा लाखाच्या आतील उत्पन्न दाखला) हवा होता. माझे उत्पन्नही सहा लाखाच्या आत आहे. पण, माझ्याकडे केवळ एका खासगी संस्थेचे अनाथ असल्याच्या ओळखपत्राशिवाय इतर कोणताही पुरावा नाही. यामुळे नॉनक्रिमीलेअर मिळू शकत नव्हते. यामुळे मी या मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरू न शकल्याने मी यासाठी संघर्ष करावयाचा निश्‍चय केला. मला पात्र ठरवले जावे यासाठी मी राज्यसेवा आयोगाचे अध्यक्ष, आमदार-खासदार, महिला बाल कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग व पुण्याचे जिल्हाधिकारी या सर्वांचे उंबरे झिजवले. पण सर्वांनी अनाथांसाठी कोणतेही धोरण नसल्याचे सांगत हात वर केले.

लढ्यात कोणाची साथ मिळाली?

मी व माझे मित्र कमलनारायण उईके, राहुल कांबळे, अ‍ॅड. राजेंद्र अनभूले, प्रवीण भांगे, पूजा ननावरे यांच्या मदतीने मुख्यमंत्री कार्यालयाचा मेल आयडीवर सर्व कागदपत्रे व अर्ज पाठवला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय संपर्कात आल्याने त्यांना या मुद्याचे महत्व पटले. यानंतर भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष भेट घालून दिली व त्यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान त्यांनी यावर एक धोरण तयार करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान नुकतीच नाकाची शस्त्रक्रियाही पुण्यातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मिलींद भोई यांनी पुर्णपणे मोफत केली. त्यांची ओळख मंत्रालयात असताना झाली होती. 

लढ्यात अपयश येईल असे कधी वाटले का?

अनाथांना जीवन जगण्यांसाठी सतत इतरांवर अवलंबून रहावे लागते. पण त्यांना  रहिवाशी, उत्पन्न या दाखल्यासह इतर सर्व कागदपत्रे सहजतेने उपलब्ध व्हावीत. जाती- धर्मानिहाय आरक्षण असल्याने यांना स्वतंत्र कॉलम असतो तर अनाथांसाठी का नसू नये म्हणून आम्ही हा प्रश्‍न काही झाले तरी तडीस लावण्याचे ठरवले. दरम्यान प्रशासकीय स्तरावर सर्वच ठिकाणी नकारघंटा येत होती. तुमच्या हाती काहीच लागणार नाही, काही उपयोग होणार नाही असे सांगुन पायही खेचण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी कोणत्याही परिस्थितीत अनाथांना आरक्षण मिळवून देण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे लढ्यात अपयश येईल असे कधीच वाटले नाही. 

आतापर्यंतचा प्रवास कसा होता?

जेव्हा मी दोन वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला गोव्यातील फोंडा येथील ‘मातृछाया’ या अनाथ आश्रमात सोडले. त्यावेळी त्यांनी त्यांचे नाव लिहिल्याने मला नाव आणि आडनाव मिळाले. पण यानंतर ते कधी मला भेटायला आले नाहीत व त्यांचा पत्ताही मला न मिळाल्यामुळे आई वडिलांशी कधी भेट झालेली नाही. या आश्रमात असताना शिक्षण सुरू होते. अठरा वर्षानंतर येथे राहता येत नसल्याने मी नंतर अहमदनगर येथे जाऊन पडेल ते कामे करत सारडा महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुण्याला आल्यावर प्रसंगी रेल्वे स्टेशनवर मुक्काम करत आणि मिळेल ते काम करत सध्या मॉडर्न कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयात एमए करत आहे. सध्या कात्रजला मुलींच्या शासकीय वसतिगृहात अनाथांच्या कोट्यातून राहत आहे. मला भविष्यात उपजिल्हाधिकारी व्हायचे आहे.