होमपेज › Pune › सोशल मीडियावर राष्ट्रवादी निष्प्रभ 

सोशल मीडियावर राष्ट्रवादी निष्प्रभ 

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:19PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनसीपी कनेक्ट अ‍ॅपचे उद्घाटन नुकतेच झाले. एकीकडे अ‍ॅपच्या माध्यमातून बूथपर्यंत संघटना मजबुतीचा, मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस निष्प्रभ दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या  स्वयंसेवकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत भाजपच्या सायबर योद्ध्यांनी कंबर कसावी, असे आवाहन केले. त्यामुळे राष्ट्रवादीलाही आता सोशल मीडियाबाबत उदासीन राहणे परवडणारे नाही.

पिंपरी-चिंचवड पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर आदी विकासकामे झाली; मात्र लोकसभा निवडणुकीपासून पक्षाला लागलेली गळती, आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे अशा दिग्गजांचा भाजपात झालेला प्रवेश, राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचा भाजपने केलेला प्रचार, या आरोपांना उत्तरे देण्यात कमी पडल्याने राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला. भाजपने सत्ता संपादन केली; मात्र या पराभवातून राष्ट्रवादीने धडा घेतल्याचे दिसत नाही. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे हे कोणी ध्यानात घ्यायला तयार नाही.

काही दिवसांपूर्वी भोसरीत झालेल्या राष्ट्रवादीच्या  मेळाव्यात माजी आमदार विलास लांडे यांनीही शहर राष्ट्रवादी सोशल मीडियावर मागे असल्याची खंत व्यक्त केली होती. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी त्याचा इन्कार करत ‘शहरात पक्षाचा सोशल मीडिया सेल, तसेच कार्यकर्त्यांचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आहेत’ असे सांगून वेळ मारून नेली. मात्र कार्यकर्त्यांच्या पोस्ट आपापसात फिरून उपयोग नाही त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. केवळ नेत्यांशेजारी उभे राहून आपली छबी सोशल मीडियावर झळकवणे यात राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते धन्यता मानत आहेत. हौस म्हणून ते ठीक असले तरी यातून पक्षाची भूमिका जनतेसमोर जात नाही. रोज घडणार्‍या घटनांचा अभ्यास करून सत्ताधार्‍यांची चुकीची कामे जनतेसमोर आणावी लागतील. पराभवाने आलेले नैराश्य झटकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून केला. पण, विधान परिषद निवडणुकीत विलास लांडे यांना डावलले गेल्याने ते नाराज आहेत.

लांडे अजित पवारांच्या शब्दाबाहेर नाहीत हे वेळोवेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीत घेतलेल्या माघारीमुळे सिद्ध झाले आहे; मात्र आ. लक्ष्मण जगताप यांचा अनुभव पाहता राजकारणात  असंभव असे काहीच नाही. त्यामुळे भविष्यात लांडे यांनी वेगळा निर्णय घेतला तर काय? या सर्व गोष्टी पाहता वेळोवेळी उत्तरे देण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असणारा ग्रुप तयार करावा लागणार आहे. शहा यांनी सोशल मीडियाने बुथनिहाय स्मार्टफोन स्वयंसेवक तयार करावेत असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रवादीलाही यातून बरेच शिकण्यासारखे आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला तर राष्ट्रवादीला निश्‍चित बरे दिवस येतील.